रुई येथील पंचगंगा नदी पात्रात नातेवाइक व मित्राच्या सोबतपोहण्यास आलेल्या इर्शाद अली शानुल सनदी (वय १६) रा. रुई, सहारा नगर गल्ली नं.८ याचा आपल्या चुलत भावास बुडताना वाचवताना | नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास पडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रुई येथील पंचगंगा नदीत इर्शाद सनदी, चुलत भाऊ नवाज सनदी, मित्र सोहेल लोकपुरे, शाहिद गोलंदाज (सर्व रा. सहारा नगर ) व वडील शानुल सनदी याच्यासह दुपारी दोनच्या सुमारास पोहण्यास आले होते. बंधाऱ्याचे दरवाजे उघडे असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला वेग आहे.
या प्रवाहात पोहताना अंदाज न आल्यामुळे नवाज सनदी हा बुडू लागला. त्याने मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर सोबत पोहणारा इर्शाद सनदी हा आपल्या भावाच्या मदतीसाठी गेला व त्याला सुखरूप बाहेर देखील काढले. दरम्यान पाण्याचा जास्त वेग असल्याने इर्शाद हा धरणाच्या दरवाजाकडे वाहत गेला.
पोहत असताना दरवाज्याच्या लाकडात त्याचा पाय अडकला. त्याने देखील मदतीसाठी आरडाओरडा केला पण कोणाचे धाडस झाले नाही. त्यामुळे तो पाण्यात बुडाला. वडील असून देखील त्यांना काहीच करता आले नाही. गावकऱ्यांच्या मदतीने बुडालेल्या इर्शाद याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेची नोंद हुपरी पोलीस ठाण्यात झाली आहे