Monday, July 28, 2025
Homeइचलकरंजीकोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; गडहिंग्लज, गारगोटी, राधानगरी, पन्हाळा, चंदगड, इचलकरंजीला झोडपले

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; गडहिंग्लज, गारगोटी, राधानगरी, पन्हाळा, चंदगड, इचलकरंजीला झोडपले

रात्री दहाच्या सुमारास ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह गारा, वाऱ्यासह पावसाने किणी, घुणकी, वाठार, चावरे, तळसंदे, पारगाव परिसराला तासभर झोडपले.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात (Kolhapur Rain) काल सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळला.

 

पहिल्याच जोरदार पावसात गडहिंग्लजमधील लक्ष्मी रोड कॉर्नरचा महामार्ग पाण्याने तुंबला. साधारण एक फूटभर पाणी महामार्गावर साचले होते. यातून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागली. दरम्यान, आयलॅण्ड परिसरातील दुकाने व घरामध्ये पाणी शिरले असून, नुकसान झाले आहे.

 

वडरगे रोडवरील एल. डी. पोवार यांच्या घराशेजारील नारळाच्या झाडावर वीज कोसळली. त्यात सुदैवाने कोणतीच जीवित हानी झाली नाही. कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे गारांचा पाऊस पडला. नगरपालिकेसमोरच संकेश्वर-बांदा महामार्ग पाण्याने तुंबला. गटारीत या पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्यावरील पाणी वाढतच गेले. सुभाष चित्रमंदिर ते आयलॅण्ड चौक परिसरात पाणी तुंबले होते. साधारण फुटाहून अधिक पाणी साचले. त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागली.

 

आयलॅण्ड चौकातील दोन पोहा सेंटरसह पालिकेसमोरील पादत्राणांच्या दुकानात पाणी घुसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच सुभाष चित्रमंदिरासमोर मांडेकर यांच्या घरातही पाणी घुसले. वडरगे रोडवरील मध्यवस्तीत एल. डी. पोवार यांचे घर आहे. शेजारीच नारळाचे झाड आहे. आज विजांच्या कडकडाटासह वळीव पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी या नारळाच्या झाडावरच वीज कोसळली. विजेमुळे लगेचच झाडाला आग लागली.

 

मुरगूडला बाजारात तारांबळ

 

मुरगूड शहरासह परिसरात आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मुरगूडचा आज आठवडी बाजार होता. यामुळे सायंकाळी घरी परतणाऱ्या शेतकरी, नागरिक, व्यापारी, भाजी विक्रेते यांची चांगलीच तारांबळ उडाली.

 

गारगोटी परिसरात विजांचा कडकडाट

 

गारगोटीसह मुदाळतिठ्ठा परिसरात विजेच्या कडकडाटासह मंगळवारी रात्री पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली.

 

यवलूज, पडळ परिसरात वादळी पाऊस

 

पन्हाळा तालुक्यातील यवलूज, पडळ, सातार्डे आदी गावांत मंगळवारी सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह अर्धा तास वादळी पावसाने झोडपून काढले. सुरक्षिततेच्या कारणावरून महावितरणने काही काळ वीजपुरवठा खंडित केला.

 

आजरा, पेरणोली परिसरात पावसाच्या सरी

 

आजरा, पेरणोली, वाटंगी परिसरात सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. वाटंगी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

 

राशिवडे, येळवडे परिसराला झोडपले

 

रात्री साडेदहाच्या सुमारास राशिवडे, येळवडे परिसरात पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सुमारे तासभर झालेल्या दमदार पावसामुळे सर्वत्र पाणी पाणी झाले. अचानक आलेल्या पावसामुळे परिसरातील वीटभट्टी आणि आंतरमशागतीच्या कामाला काहीसा फटका बसणार असला, तरी पिकांना पोषक असाच पाऊस ठरणार आहे. रात्री उशिरापर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता.

 

राधानगरीत दमदार

 

दिवसभराच्या उष्म्यानंतर राधानगरी व परिसरामध्ये सायंकाळी पाऊस झाला. ढगांच्या गडगडाटासह झालेल्या वादळी पावसामुळे उष्मा कमी झाला. सायंकाळी सातच्या सुमारास सुमारे तासभर मोठा पाऊस झाला.

 

जयसिंगपूर परिसरात चिखलामुळे वाहने घसरली

 

जयसिंगपूर शहर आणि परिसरात सोसाट्याचा वारा, ढगांच्या गडगडाटात वळीव पावसाने हजेरी लावली. रात्री नऊच्या सुमारास हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून शाळू पिकाची कापणी करण्यात आली होती. खुडणी करण्याआधीच मंगळवारच्या पावसाने ज्वारीची कणसे पावसात भिजून गेली. भिजलेला शाळू काळपट पडण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. तसेच काढणी, कापणी, मळणी झाल्यानंतर शेतात विखरून पडलेला सुका चारा कडबादेखील पावसात भिजून गेला. शहरात भुयारी गटरच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली आहे. खोदाई झालेल्या मार्गांवर रात्रीच्या सुमारास चिखलाचा अंदाज न आल्याने अनेक वाहने घसरून किरकोळ स्वरूपाचे अपघात झाले.

 

सेनापती कापशी परिसरात बरसला

 

सेनापती कापशी परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण, सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि रात्री आठच्या सुमारास चांगला पाऊस झाला. बाळेघोल, तमनाकवाडा, माद्याळ, कासारी, करंजिवणे, बेनिक्रे, हमिदवाडा, लिंगनूर परिसरात सुमारे अर्धा तास पावसाने झोडपले. काही काळ परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला.

 

चंदगडला पावसाने झोडपले

 

चंदगड शहर परिसरात आज दुपारी सव्वाच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह सुमारे वीस मिनिटे पावसाने झोडपून काढले. जोरदार सरींमुळे अवघ्या काही क्षणांत सर्वत्र पाणीच पाणी झाले.

 

इचलकरंजीत जोरदार सरी

 

इचलकरंजी शहरात आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाच्या सरी आल्या. यावेळी विजांचा कडकडाट झाला. यामुळे वातावरणातील आर्द्रता कमी होऊन गारवा निर्माण झाला होता. सोमवारी रात्री शहरातील काही भागांत पावसाचा शिडकाव झाला होता. आज रात्री मात्र संपूर्ण शहरात पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

 

घुणकी परिसरात झाडे पडली

 

रात्री दहाच्या सुमारास ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह गारा, वाऱ्यासह पावसाने किणी, घुणकी, वाठार, चावरे, तळसंदे, पारगाव परिसराला तासभर झोडपले. काही ठिकाणी झाडे पडली असून, विद्युत तारा तुटल्या आहेत. या परिसरातील विद्युतपुरवठा खंडित झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -