महाराष्ट्र सरकारनं 2023-24 च्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अनुदानात राज्य शासनाच्यावतीनं भर घालण्याच्या हेतूनं ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हप्त्यांची रक्कम जमा झाली आहे. आता महाराष्ट्रातील या योजनेतील पात्र शेतकऱ्यांना डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीसाठी सहाव्या हप्त्याच्या रकमेच्या वितरणासाठी राज्य सरकारनं 1642 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्राच्या कृषी विभागामार्फत या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना का आर्थक विरषात 6000 रुपये दिले जातात. कृषी विभागानं मान्यता दिलेल्या 1642.18 कोटी रुपये आणि विभागाकडे यापूर्वी शिल्लक असलेल्या 653.50 कोटी रुपयांचा वापर केला जाईल. शासन निर्णयानुसार नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा हप्ता डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीसाठी आणि यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित लाभार्थ्यांना रक्कम अदा करण्यासाठी 1642 कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे.
आतापर्यंत किती शेतकऱ्यांना लाभ?
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या उत्पन्नास जोड देण्यासाठी दिलेल्या आर्थिक सहाय्याव्यतिरिक्त अतिरिक्त आर्थिक सहाय्य देण्याासाठी राज्य शासन सन 2023-24 पासून ही योजना राबवित आहे. या योजनेद्वारे पीएम किसान योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रति वर्ष 6000 रुपये वार्षिक अनुदान तीन समान हप्त्यात थेट लाभहस्तांतरणाद्वारे दिले जाते. या योजनेंतर्गत माहे ऑक्टोबर, 2024 पर्यंत राज्यातील 91.45 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 9055.83 कोटी रक्कम जमा करण्यात आली.
पीएम किसानचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती लाभ?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नास जोड देण्यासाठी केंद्र शासनानं सन 2018-19 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) राबवित आहे. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकरी कुटुंबांना एकूण 6000 वार्षिक अनुदान तीन समान हप्त्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दिले जाते. योजना सुरू झाल्यापासून माहे ऑक्टोबर 2024 पर्यंत राज्यातील 117.55 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 33468.54 कोटी रक्कम जमा करण्यात आली.
दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रकमेत 3000 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीत या संदर्भातील आश्वासन दिलं होतं. त्यामुळं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसानचे 6000 आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे 9000 असे एकूण 150000 रुपये मिळतील.