सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्या महिलेची फसवणूक करून जातीवाचक शिवीगाळ करत ४० लाखांची खंडणी मागणारा कोल्हापूरचा व्यावसायिक योगेश वसंत पाटील (रा. करवीर वाचनालयाशेजारी, भवानी मंडप, कोल्हापूर) याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.
त्याला न्यायालयात हजर केले असता, एक एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश दिला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित महिला विश्रामबाग परिसरात राहते. संशयित योगेश पाटील व पीडितेची नऊ महिन्यांपूर्वी ओळख झाली. त्याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याकडून या कालावधीत रोख सात लाख रुपये, सोन्याची अंगठी व डायमंड रिंग घेतली. हा ऐवज परत न देता तिची फसवणूक केली.
तसेच पीडितेला पाटील याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळही केली. तिच्या मोबाईलमधील डेटा प्रसारित करण्याची धमकी देऊन ४० लाख रुपये व चार सोन्याच्या बिस्किटांची खंडणी मागितली. याबाबत पीडितेच्या तक्रारीवरून योगेश पाटील याच्याविरूद्ध ॲट्राॅसिटी, खंडणीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
योगेश पाटील याला बुधवारी पोलिसांनी कोल्हापूरमधून ताब्यात घेतले. त्याच्यावर अटकेची कारवाई करत न्यायालयात हजर केले. त्यांना एक एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उपअधीक्षक विमला एम. पुढील तपास करत आहेत.