Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगआईसमोर ओढून नेले चिमुरडीला; बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू

आईसमोर ओढून नेले चिमुरडीला; बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू

धनगरवाडी व चितळी शिवेवरील (ता. राहाता) वस्तीवर बुधवारी (दि. 26) रात्री नऊच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला आहे.

 

बिबट्याने तिला 200 फूट फरफटत शेतामध्ये नेले होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

दिघी, धनगरवाडी व चितळी शिवेवर संतोष लक्ष्मणराव राशिनकर यांची वस्ती आहे. त्यांच्या कुटुंबीयांचे रात्री जेवण झाले. तेव्हा मुलगी हात धुण्यासाठी बाहेरील पाण्याच्या हौदाकडे गेली. तिच्यासोबत भांड्यांची टोकरी घेऊन आई देखील बाहेर आल्या.

 

मुलगी हात धुण्यासाठी ओट्यावरून खाली उतरली, तेव्हा शेजारच्या मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप घेऊन मुलीच्या मानेला पकडले आणि शेतात ओढून नेले. ते पाहताच आईने हातातील टोकर खाली टाकून आरडाओरडा केला आणि बिबट्याच्या मागे पळाल्या. घरातील व शेजारचे लोकही धावले.

 

दरम्यान, बिबट्या ओढून नेत असताना मुलीचा फ्रॉक बांधावरील गजाला अडकला. त्यातच धावत येणारे लोक पाहून आणि आरडाओरडा ऐकून बिबट्याने मुलीला सोडून दिले व तो दहा फुटांवर जाऊन उभा राहिला. संतोष राशिनकर, रावसाहेब राशिनकर व इतरांनी मुलीला उचलले. त्या वेळी बिबट्या त्यांच्याकडे पाहून गुरगुरत होता.

 

मुलीला तातडीने प्रवरानगर येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात मुलीवर वस्तीसमोरील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी राहुरी विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी युवराज पाचारणे, अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी संतप्त नागरिकांनी वन विभागाच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले. दरम्यान, चितळी येथील तलाठी रवींद्र शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.

 

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा कार्यालयातील अधिकार्‍यांनी, तसेच आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यालयातील अधिकार्‍यांनी विविध विभागांशी संपर्क करून राशिनकर कुटुंबाला मदत केली.

 

बिबट्यांची नसबंदी करा

 

घटनेनंतर वन विभागाच्या अधिकार्‍यानी तीन पिंजरे आणून परिसरात लावले. परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिकांना घराबाहेर पडणे, शेतीची मशागतीची कामे करणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे वन विभागाने ड्रोनच्या माध्यमातून बिबट्यांचा शोध घेऊन, त्यांना पकडून नसबंदी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसा ग्रामपंचायतीचा ठराव देणार असल्याचे सांगण्यात आले.

 

राजकीय नेत्यांना जाब विचारा

 

वन विभागाच्या अधिकार्‍यांना नागरिकांनी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. त्या वेळी एक कर्मचारी म्हणाला, की वन विभागात कर्मचारी आहेत का? पिंजरे आहेत का? तुमच्याकडे येणार्‍या राजकीय नेत्यांबरोबर तुम्ही फोटो काढता. त्यांना याचा जाब विचारा, असे ठणकावले.

 

आठ पिंजरे, अडीचशे बिबटे

 

वन विभागाच्या कोपरगाव कार्यालयाकडे कोपरगाव, राहाता व श्रीरामपूर तालुक्याची जबाबदारी आहे. या एकेका तालुक्यात दीडशे ते अडीचशे बिबटे असल्याची माहिती मिळाली. परंतु प्रत्येक तालुक्यासाठी वन विभागाकडे सात ते आठ पिंजरे असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -