आज १ एप्रिल… नव्या आर्थिक वर्षाचा हा पहिलाच दिवस… मात्र एप्रिलच्या पहिल्याच दिवशी देशातील जनतेला मोठी गुड न्यूज मिळाली आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरचे नवे दर (LPG Cylinder Price) जाहीर केले आहे. त्यानुसार, LPG गॅस सिलेंडरची किंमत आता ४५ रुपयांनी स्वस्त झाली आहे. मात्र सिलेंडरच्या किमतीतील हि घट १९ किलोच्या व्यावसायिक गॅस साठी करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी १ जानेवारी रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती १४.५० रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलेंडर ४५ रुपयांनी स्वस्त झाल्याने खास करून हॉटेल चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नवे दर कसे आहेत ? LPG Cylinder Price
LPG गॅस सिलेंडरच्या किमतीतील बदलाचा परिणाम देशातील विविध शहरांमध्येही दिसून आला आहे. इंडियन ऑइलने जारी केलेल्या ताज्या दरानुसार मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता १७५५.५० रुपयांऐवजी १७१४.५० रुपयांना उपलब्ध होईल. कोलकातामध्ये हा सिलेंडर १९१३ रुपयांवरून १८७२ रुपये झाला आहे, तर चेन्नईमध्ये नवीन किंमत १९६५ रुपयांवरून १९२४ रुपयांवर आली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती घसरल्यामुळे आता हॉटेल मधील जेवण सुद्धा काही प्रमाणात स्वस्त होण्याची शक्यता आहे.
तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींचा (LPG Cylinder Price) आढावा घेतात आणि गरजेनुसार त्या वाढवतात किंवा कमी करतात. गेल्या महिन्यात म्हणजेच १ मार्च २०२५ रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६ रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र, आता नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे, घरगुती वापरासाठी १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत हे दर ८०३ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये, कोलकातामध्ये ८२९ रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपये आहेत.