महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य घरकुल आवास योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी आयुक्त पल्लवी पाटील यांनी शुक्रवारी (११ एप्रिल) रोजी दुपारी ४ वाजता रवि रजपुते सोशल फौंडेशन सोबत महत्वपुर्ण बैठक आयोजित केली आहे. या बैठकीकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
माजी उपनगराध्यक्ष रवि रजपुते यांनी २५ वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी बैठ्या घरांची मागणी केली आहे. परंतु महानगरपालिकेच्या वतीने बहुमजली इमारतींचा आराखडा तयार केला आहे. रवि रजपुते सोशल फौंडशनने या आराखड्याला विरोध दर्शविला आहे. माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी या संदर्भात १४ एप्रिलपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांनी उपोषण मागे घेण्यासंदर्भात महानगरपालिकेने ४ एप्रिल रोजी पत्र दिले आहे. मात्र, त्यावर समाधान न झाल्याने रजपुते यांनी आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला आहे.
या पार्श्वभूमीवर आयुक्तप पल्लवी पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य घरकुल आवास योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवारी बैठक बोलावली आहे.
या बैठकीत होणाऱ्या निर्णयावरच रजपुते यांच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे.