कापडावर प्रक्रिया केल्यानंतर सांडपाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिनीच्या चेंबरलाच गळती लागल्याने शहापूरमधील निलगिरी बाग परिसरात रसायनयुक्त सांडपाणी पसरले आहे.
त्याचा उग्र वास व रासायनिक सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर सांडपाणी गटारीजवळ असलेल्या मोठ्या खणीत मिसळून जलचर मृत्यमुखी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.
कापडावर प्रक्रिया करणाऱ्या प्रोसेसमधील रसायनयुक्त सांडपाण्यामुळे सातत्याने प्रदुषणाचा प्रश्न निर्माण होत असल्याने अशा सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी सामुहिक सीईटीपी प्रकल्प उभारला आहे. त्याठिकाणी प्रोसेसचे सांडपाणी वाहून नेण्यासाठी पाइपलाईन टाकली असून त्यावर
ठिकठिकाणी चेंबर आहेत. त्यापैकीच शहापूरमधील निलगिरी बाग परिसरातील चेंबरला काही दिवसांपासून गळती लागली आहे.
त्यातून रसायनयुक्त पाणी परिसरात पसरल्याने त्यातूनच नागरिकांसह लहान मुलांना वाट काढत जावे लागत आहे. तर उग्र वासामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. हे सांडपाणी गटारीत मिसळत असून भागातील नळांना दुषित पाणी
येत आहे. गटारीतून हे सांडपाणी जवळच असलेल्या मोठ्या खणीत मिसळत आहे. याबाबत सीईटीपीकडे तक्रार करुनही दुर्लक्ष केले जात असल्याने शिवसेनेचे शहराध्यक्ष भाऊसो आवळे यांनी आयुक्तांकडे याबाबत तक्रार करून त्वरीत कार्यवाहीची मागणी केली आहे. तसेच कार्यवाही न झाल्यास प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.