बारामती तालुक्यातील को-हाळे खुर्द येथील 16 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अंकिता कडाळे असं आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. या विद्यार्थिनीने 8 एप्रिल 2025 रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तिला काही दिवसांपासून विशाल दत्तात्रय गावडे आणि त्याचे मित्र प्रविण गावडे, शुभम गावडे व सुनील खोमणे यांच्याकडून मानसिक त्रास दिला जात असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे.
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विशाल गावडे तिचा पाठलाग करत होता, तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता आणि नकार दिल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत होता. या त्रासाला कंटाळून अंकिताने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.