शिरोली : शिये-कसबा बावडा रस्त्यावर मालवाहतूक
कंटेनर आणि दुचाकी यांची धडक होऊन झालेल्या अपघातात महाविद्यालयीन युवक जागीच ठार झाला. उत्कर्ष सचिन पाटील (रा. महाडिक कॉलनी, टोप) असे त्याचे नाव आहे.
हा अपघात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास उषा नर्सरीसमोर झाला.
घटनास्थळावरून आणि शिरोली पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, टोप येथील उत्कर्ष पाटील हा युवक बारावीच्या क्लाससाठी कसबा बावडा येथे दुचाकीवरून जात होता. शिये फाटा ओलांडून उषा नर्सरी येथून जात असताना कसबा बावडाकडून शियेच्या दिशेने भरधाव येणाऱ्या मालवाहतूक कंटेनरचालकाला रस्त्याच्या मधोमध डाव्या बाजूस असणाऱ्या विजेच्या खांबाचा अंदाज आला नाही.
त्यामुळे त्याने गाडी उजव्या बाजूला वळविल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला कंटेनर धडकला. त्यामुळे उत्कर्ष पाटील गाडीवरून डोक्यावर पडला. त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने तो जागीच ठार झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली आहे.
रस्त्यावर मधोमध खांब धोकादायक
शिये फाटा ते परमार पेट्रोल पंपपर्यंत रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पण, या रस्त्यात अनेक विजेचे खांब रस्त्याच्या मधोमध आले आहेत. हे खांब महावितरण कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील समन्वय नसल्यामुळे काढण्यात आलेले नाहीत. हे खांब अपघातास निमंत्रण देत आहेत. सोमवारी झालेला अपघात हा रस्त्यावर मधोमध असलेल्या खांबांमुळेच झाल्याची घटनास्थळावर चर्चा सुरू होती.
गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट
या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम झाले असले तरी कुठेही गतिरोधक बसविलेला नाही. शिये फाटा ते बावड्यापर्यंत रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. औद्योगिक वसाहत असल्याने जवळच परप्रांतीय कामगार राहत असल्याने येथे सतत वर्दळ असते. तसेच एक परीक्षा केंद्र असल्याने विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. याचा विचार करून गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे.
दुभाजकाचा पत्ताच नाही
या रस्त्यावर कुठेही दुभाजक उभारलेले नाहीत. त्यामुळे सुसाट वेगाने जाणारी वाहने कशाही पद्धतीने ओव्हरटेक करत असल्याचे दिसून येत आहे. लोकांचे जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल केला जात आहे.