दागिने गहाण ठेवून घेतलेल्या रकमेची मुद्दल व्याजासह परतफेड करूनही दागिने देण्यास नकार देणाऱ्या पद्मजा इंगवले (रा मंगळवार पेठ) या महिलेला पोलीस ठाण्यातच मारहाण केली. ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता गाव भाग पोलीस ठाण्यात घडली.
दरम्यान, मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी इंगवले या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. सुदर्शन ऊर्फ गंगा प्रशांत कांबळे (रा. टाकवडे वेस) यांनी फिर्याद दिली. (Kolhapur Crime News)
कांबळे यांनी ओळखीतून पद्मजा इंगवले यांच्याकडे चार तोळे गहाण ठेवून ८७ हजार रुपये घेतले होते. व्याजासह मुद्दल परत करूनही इंगवले दागिने परत करीत नव्हत्या. ५ टक्के व्याज दिल्याशिवाय दागिने देण्यास नकार दिल्याचेही कांबळे यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे. शेवटी हे प्रकरण पोलिसांत गेले. कांबळे या सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी कुबडगे, सावित्री हजारे यांच्यासह महिलांना घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचल्या. तिथे महिलांनी इंगवले यांना मारहाण केली. सौ. कांबळे यांनी गावभाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून स्वतः सह अश्विनी कुबडगे, यास्मिन सनदी यांना इंगवले यांनी मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान, सुदर्शन ऊर्फ गंगा कांबळे यांनी पद्मजा इंगवले यांच्यावर खासगी सावकारी व जातिवाचक शिवीगाळ करून दागिने हडप केल्याप्रकरणी कडक कारवाई करावी, अशी मागणीही पोलिस उपअधीक्षक तसेच गावभाग पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.