Sangli: सांगली, कोल्हापुरात सोनसाखळी चोरसांगली, कोल्हापूर : लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी चार तासांत सात ठिकाणी
सोनसाखळी हिसकावण्याचा सपाटा लावला. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सांगलीमधून सुरू झालेला हा चोऱ्यांचा सिलसीला जयसिंगपूर, इचलकरंजी, हेरले, कसबा बावडा-कोल्हापूरनंतर इस्लामपुरात थांबला.
यामुळे सांगलीसह कोल्हापूर पोलिसांचीही तारांबळ उडाली. संशयितांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सांगलीमध्ये आज सकाळी आठला महिलेचा दागिना हिसकाविण्याचा प्रकार घडला. तेथून पलायननाच्या प्रयत्नात चोरटे दुचाकी घसरून पडले. ने दोघांनी बॅग टाकून पळ काढला. बॅगेत चोरट्यांचे कपडे होते. सांगली, विश्रामबाग पोलिसांत रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार नोंद झालेली नव्हती.
सकाळी नउच्या सुमारास याच चोरट्यांनी जयसिंगपूरमध्ये महिलेचा दागिना हिसकावला. भरधाव वेगात ते इचलकरंजी परिसरातील आले. सोलगे मळा परिसरातील स्वयंभू शिवमंदिराजवळ वृषाली शशिकांत जाधव (वय ४०, सोलगे मळा, एकता कॉलनी, इचलकरंजी) मुलीला क्लासला सोडून दुचाकीवरून घरी परतत असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले. अर्धा तुकडा जमिनीवर पडला, उर्वरित घेऊन चोरटे पसार झाले. सकाळी साडेनऊला प्रकार घडला.
पावणे अकराला चोरटे कदमवाडीमार्गे कसबा बावड्यातील बिरंजे पाणंद परिसरात आले.
याठिकाणी मनिषा सतिश कुरणे (वय ५३, रा. श्रीराम कॉलनी) यांच्या गळ्यातील मनी मंगळसूत्राला हिसडा मारला. यामध्ये अर्धे मंगळसूत्र कुरणे यांच्या हातातच राहिले. याच चौकातून वळण घेत समोरून आलेल्या सुमित्रा सुरेश मोरे (६०, रा. रत्नदीप कॉलनी) यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली. लागोपाठ झालेल्या घटनांमुळे महिलांना आरडाओरडा केला. स्थानिक तरूणांनीही या चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरटे शिये मार्गे पसार झाले.
दुचाकीवरील या चोरट्यांपैकी चालकाने लाल रंगाचा टी शर्ट व निळी जिन्स परिधान केली होती; तर मागे बसलेल्या चोरट्याने हिरवट टी शर्ट व दगडी पॅन्ट घातली होती. दोघांचेही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागताच तपास गतिमान करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संशयितांची नावे निष्पन्न करून शोधासाठी पथकेही रवाना केली.
हिसडा मारून चोरी
इस्लामपूर : सांगली, कोल्हापूरनंतर चोरटे इस्लामपुरात आले. ताकारी-दुधारी रस्त्यावर दुचाकी गाडीवरून निघालेल्या ३४ वर्षीय महिलेच्या आडवी गाडी मारून त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे दागिने हिसडा मारून नेले. दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास प्रकार घडला. सीमाताई विजय कदम (वय ३४, दुधारी) यांनी इस्लामपूर पोलिसांत फिर्याद दिली. सीमाताई दुचाकीवरून (एमएच १०, सीसी ८०७५) दत्त मंदिराजवळून निघाल्या असताना चोरटे मोटारसायकलवरून आले. गाडी आडवी मारली. सीमाताईंनी जाब विचारला असता माफी मागण्याचे नाटक करून धक्का मारला.