पहलगाम हल्ल्यात निष्पाप 28 नागरिकांचा बळी गेल्यानंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांना गोळ्या घातल्या. त्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. अनेक ठिकाणी निदर्शनं केली जात आहे. तर दहशतवाद्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. असं सर्व भीतीदायक वातावरण असताना बीसीसीआयने एक मोठं पाऊल उचललं आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान चार मोठे निर्णय घेतले आहेत. तसेच दोन गोष्टी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यात दिसणार आहे. हा सामना 23 एप्रिलला होणार आहे.
सध्याची स्थिती पाहता बीसीसीआयने दोन गोष्टींवर बंदी घातली आहे. एक म्हणजे चीयरलीडर्स सामन्यात डान्स करताना दिसणार नाहीत. दुसरं, सामन्यादरम्यान फटक्यांची आतषबाजी होणार नाही. बीसीसीआयने या गोष्टींवर बंदी घालण्याचा निर्णय 23 एप्रिलला होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यासाठी घेतला आहे.
बीसीसीआयने चीअरलीडर्स आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यावर बंद घालण्याव्यतिरिक्त दोन आणखी निर्णय घेतले आहे. एक म्हणजे दोन्ही संघांचे खेळाडू आणि सर्व पंच 23 एप्रिलला काळी पट्टी बांधून मैदानात उतरतील. तसेच या सामन्यापूर्वी दोन्ही संघ एका मिनिटाचं मौन ठेवतील. दहशतवादी हल्ल्यानंतर बीसीसीआयने पाकिस्तानविरुद्ध आधीच कठोर पावलं उचलली आहे. टीम इंडिया पाकिस्तानात जात नाही आणि पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळत नाही. आयसीसी स्पर्धेतच दोन्ही संघ आमनेसामने येतात. तर आयपीएल स्पर्धेतही पाकिस्तानी खेळाडूंवर आधीच बंदी घालण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 28 निष्पाप पर्यटकांचा बळी घेतला. यावेळी त्यांना धर्म विचारून गोळ्या घातल्या. पर्यटनस्थळी दहशतवादी पोलिसांचा गणवेश घालून फिरत होते. त्यामुळे पर्यटकांना संशय आला नाही. त्यानंतर त्यांनी क्रूरकृत्य केलं. पहलगाममधील हल्ल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. दरम्यान हल्ल्यातील दोषींना सोडणार नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.
दुसरीकडे, आयपीएल स्पर्धेतील प्लेऑफची शर्यत चुरशीची झाली आहे. यामुळे मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांना विजय महत्वाचा आहे. मुंबईने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला तर टॉप 4 मध्ये स्थान मिळेल. तर स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी सनरायझर्स हैदराबादला मुंबईला पराभूत करणं आवश्यक आहे.