जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांचा बळी गेला असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला , याना आधार देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने तातडीने निर्णय घेत, मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक नागरिकाच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याशिवाय पुण्यातील संतोष जगदाळे यांच्या मुलीला सरकारी नोकरी देण्याचाही निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे.
आर्थिक मदत व नोकरीचे आश्वासन –
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांना आधार दिला. यावेळी त्यांनी आर्थिक मदत व नोकरीचे आश्वासन दिले होते, त्यानुसार मंत्रिमंडळाने अधिकृत निर्णय घेतला आहे. या मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये ठाण्याचे हेमंत सतीश जोशी आणि संजय लक्ष्मण लेले, मुंबईचे अतुल श्रीकांत मोने, पनवेलचे दिलीप देसले तसेच पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा समावेश आहे.
हल्ल्याची कठोर कारवाई (Pahalgam Terrorist Attack) –
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून निर्दोष पर्यटकांवर गोळीबार केला, ही घटना अतिशय निंदनीय आहे. देशभरातून या क्रूर हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून, शोकसंतप्त वातावरण आहे. तसेच जनता केंद्राकडे आणि राज्य सरकारकडे या हल्ल्याची कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करत आहेत.