सोमवारी जगातील अब्जाधीशांच्या संपत्तीत चढउतार दिसला. कमाईच्या दृष्टीने या भारतीयाने उद्योगपतीने जगातील दिग्गजांना मागे टाकले. या अब्जाधीशाच्या संपत्तीत एकाच दिवसात 47,200 कोटींची भर पडली. एकीकडे भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग गडद होत असताना भारतीय उद्योजकाने घेतलेली भरारी चर्चेचा विषय ठरली आहे. या अब्जाधीशावर गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने परदेशातून आरोपांची राळ उठली आहे. तर भारतीय राजकारणात विरोधी पक्ष सुद्धा या उद्योजकावरून सरकारवर सातत्याने निशाणा साधत आले आहेत.
गौतम अदानी यांच्या संपत्तीत तुफान
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना सोमवारी दुप्पट फायदा झाला. वर्ष 2025 मध्ये अदानी आता सर्वाधिक कमाईदारांच्या यादीत अग्रेसर आहेत. एकाच दिवसात त्यांच्या संपत्तीत 5.61 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 47,200 कोटींची भर पडली. सोमवारी गौतम अदानी यांनी कमाईच्या दृष्टीने एलॉन मस्क यांना, मुकेश अंबानी यांना मागे टाकले. अदानी समूहाच्या विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये बंपर उसळीमुळे त्यांचा कमाईचा आलेख उंचावला. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार अदानी आता 82.2 अब्ज डॉलरच्या एकूण संपत्तीसह श्रीमंतांच्या यादीत 20 व्या क्रमांकावर आहेत.
एक वृत्त आणि शेअरमध्ये उसळी
अदानी समूहाच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी उसळी आली आहे. गौतम अदानी यांच्या काही अधिकाऱ्यांच्या लाचखोरीप्रकरणाचे आरोप हटवण्यासाठी आणि चौकशी करण्याची गरज नसल्याची मागणी करण्यासाठी अमेरिकन प्रशासनाची भेट घेतल्याचे समोर आले होते. हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे अदानी यांच्या विविध शेअरमध्ये मोठी वाढ झाली.
बीएसईवर अदानी टोटल गॅसच्या शेअरमध्ये 11.01 टक्के, अदानी इंटरप्रायजेसच्या शेअरमध्ये 6.96 टक्के, अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 6.61 टक्के, अदानी पोर्ट्समध्ये 6.29 टक्के आणि अदानी पॉवरमध्ये 5.96 टक्क्यांची तेजी दिसून आली. एनडीटीव्हीच्या शेअरमध्ये 4.74 टक्के, अदानी एनर्जीच्या शेअरमध्ये 3.30 टक्के, एडब्ल्यूएल एग्री बिझनेसमध्ये 1.99 टक्के, अंबुजा सिमेंट्समध्ये 1.76 टक्के, एसीसीमध्ये 1.04 टक्के, सांघी इंडस्ट्रीजमध्ये 0.72 टक्क्यांची तेजी दिसून आली. या नवीन घडामोडींमुळे अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. एकाच दिवसात वाढलेल्या संपत्तीमुळे ते श्रीमंतांच्या यादीत पुढे आले.