भारतीय सैन्य दलांकडून पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करुन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यात आला आहे. इंडियन आर्मीच्या एक्स अकाऊंटवरुन जस्टीस इज सर्वड अशा प्रकारचं ट्विट करून ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. भारताकडून सतर्कता म्हणून देशभर मॉक ड्रील केलं जात आहे. या दरम्यान ऑपरेशन सिंदूरचा आयपीएलवर परिणाम होऊ शकतो अशा चर्चा सुरु आहेत. काही जणांनी आज होणारी चेन्नई विरुद्ध कोलकाता मॅच होणार की नाही याबाबत देखील चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर बीसीसीआयनं यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.
चेन्नई विरुद्ध कोलकाता मॅच खरंच रद्द होणार?
वृत्तसंस्था एएनआयच्या नुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या यंदाच्या हंगामावर कोणताही परिणाम होणार नाही. भारत पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाचा आयपीएलवर परिणाम होणार नाही. आयपीएल ज्या प्रकारे सुरु आहे त्यानुसार सुरु राहील. आज चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील मॅचवर देखील कोणताही परिणाम होणार नाही. चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्यातील मॅच सायंकाळी 7 .30 वाजता सुरु होईल.
गुणतालिकेत दोन्ही संघांची स्थिती काय?
आयपीएल 2025 च्या प्लेऑफ मध्ये प्रवेश करणाऱ्या संघांची नावं येत्या काही दिवसात निश्चित होतील. चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पाडली आहे. कोलकाताना अजून देखील टॉप 4 मध्ये जाण्याची आशा आहे. चेन्नई विरुद्धच्या मॅचमध्ये अजिंक्य रहाणेच्या केकेआरला विजय मिळवावा लागेल. चेन्नई विरुद्ध जिंकल्यास केकेआरचं आव्हान कायम राहील.
चेन्नई सुपर किंग्जनं आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना केवळ 2 मॅचमध्ये विजय मिळवता आला आहे. तर, 9 मॅचेसमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. केकेआरनं देखील आतापर्यंत 11 मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये 5 विजय आणि 5 पराभव झाला आहे. तर, एका सामन्याचा निकाल जाहीर झालेला नाही. केकेआरच्या नावावर सध्या 11 गुण असून ते सहाव्या स्थानावर आहेत. केकेआरला राहिलेल्या तीन मॅच जिंकणं आवश्यक आहे.
दरम्यान, मुंबईला पराभूत करत गुजरात टायटन्सनं गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवलं आहे. तर, दुसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आहे. तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्ज असून चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्स आहे. पाचव्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स आणि सहाव्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्स हा संघ आहे. तर, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबादचं आव्हान संपुष्टात आलं आहे.