कडक उन्हाळ्यात शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. कारण या दिवसांमध्ये शरीराला जास्त पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यात बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा इतर वेळी सतत घाम येतो. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते. शरीरातील पाणी कमी झाल्यानंतर डिहायड्रेशन, अंगात उष्णता वाढणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्या उद्भवू नये म्हणून उन्हाळ्यात भरपूर पाणी, थंड पदार्थांचे(shake) सेवन करावे.
आज आम्ही तुम्हाला कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी बदाम शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बदाम शेक लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडते. बदाम आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. त्यामुळे दिवसाची सुरुवात तुम्ही बदाम शेक(shake) पिऊनसुद्धा करू शकता. चला तर जाणून घेऊया बदाम शेक बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
दूध
बदाम
कस्टर्ड पावडर
जायफळ पावडर
वेलची
केशर काड्या
काजू, पिस्त्याचे तुकडे
साखर
कृती:
बदाम शेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, ८ ते ९ बदाम पाण्यात रात्रभर भिजत ठेवा, भिजलेल्या बदामाची साल काढून घ्या.
कढईमध्ये दूध गरम करून ते आटेपर्यंत व्यवस्थित मिक्स करत राहा. १ लिटर दूध अर्धा लिटर झाल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवा.
आटलेल्या दुधात साखर घालून मिक्स करून घ्या. साखर पूर्णपणे विरघल्यानंतर कस्टर्ड पावडर घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा.
त्यानंतर दूध सतत मिक्स करत राहा. ज्यामुळे दुधाच्या गुठळ्या होणार नाहीत.
मिक्सरच्या भांड्यात साल काढून घेतलेले बदाम आणि थोडस पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा.
तयार केलेली पेस्ट दुधामध्ये मिक्स करा. त्यानंतर त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर आणि केशर काड्या टाकून मिक्स करा.
गॅस बंद करून तयार केलेले मिश्रण मोठ्या वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर फ्रिजमध्ये २ किंवा ३ तास सेट होण्यासाठी ठेवा.
तयार आहे आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बदाम शेक. तुम्ही बनवलेले हे बदाम शेक घरातील सगळ्यांचं नक्की आवडेल.