Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रदेवदर्शनाआधीच मृत्यूने गाठले ! लोणंदजवळ टेम्पो ट्रॅव्हलर व ट्रकचा भीषण अपघात ,...

देवदर्शनाआधीच मृत्यूने गाठले ! लोणंदजवळ टेम्पो ट्रॅव्हलर व ट्रकचा भीषण अपघात , 2 ठार 14 जखमी

भाविकांना घेऊन देवदर्शनासाठी निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला मालवाहू ट्रकने जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. हा अपघात लोणंदजवळ शनिवारी (दि.११) रात्री झाला. यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला असून, १४ जण जखमी झाले आहेत.

 

देवदर्शनाआधीच जाण्याआधीच दोघा जणांना मृत्यूने गाठले. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

 

अपघातात मृत्यू झालेल्यांची रजनी संजय दुर्गुळे (वय ४८ रा. पेठ वडगाव) व चालक सलमान इम्तियाज सय्यद (वय २४ रा. शिरढोण ता.शिरोळ) नावे आहेत. तर सर्व जखमी इचलकरंजी, वडगांव व कोडोली येथील आहेत.

 

शशिकला ध्रुवकुमार बोनगे (वय ६६), दिपाली नागेश बोनगे (वय४२) ईश्वरी नागेश बोनगे (वय २२) शारदा महेश मोनगे (वय ४१) शिला राहुल बोनगे (वय ३७), ईच्छा राहुल बोनगे (वय १५) प्रथमेश महेश बोनगे (वय ७), ध्रुवकुमार पांडुरंग बोनगे (वय ७०) मंगल वसंत सुतार (वय ६४),चंद्रकांत अतिगीडद (वय ४८ सर्व रा गोकुळ चौक, आयजीएम हॉस्पीटल जवळ, इचलकरंजी ),वासंती विलास सवाईराम (वय ६९ रा.पुणे), वैशाली अनिल दुर्गुळे (वय ४९), ज्योती दिपक मुदगल (वय ५० रा कोडोली ता. पन्हाळा जि. कोल्हापुर) अशी जखमींची नावे आहेत.

 

शनिवारी (दि.११) रात्री हे सर्वजण देवदर्शनाकरीता उज्जैनला जाण्यासाठी निघाले होते. रात्री दहा वाजता इचलकरंजी येथून निघालेली ही ट्रॅव्हल्स अकराच्या सुमारास वडगाव येथे आली. वडगाव येथून सर्वाना घेतल्यानंतर रात्री अकरा वाजता निघाली. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सातारा ते लोणंद मार्गांवर ट्रॅव्हल्स जात असताना मौजे सालपे (ता. फलटण जि. सातारा) गावच्या हद्दीत बिरोबा मंदिराजवळ विरुद्ध दिशेने लोणंदकडुन साताराकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्रमांक – एमएच ४२ बीएफ ७७८४) ट्रॅव्हल्सला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ,टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाच्या बाजुचा चक्काचूर झाला.

 

भीषण अपघातात ट्रॅव्हल्स चालक सलमान इम्तीयाज सय्यद व चालकाच्या मागील तिसऱ्या सीटवर बसलेल्या रजनी संजय दुर्गुळे यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच दीपा बोनगे, ईश्वरी बोनगे व ज्योतो मुदगल या तिघी गंभीर जखमी झाल्या तर इतर प्रवाशीही मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. गंभीर जखमीवर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांच्या धडकेच्या आवाजाने परिसरातील ग्रामस्थ झोपेतून जागे झाले आणि त्यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी आणि येणा-जाणाऱ्या वाहनधारकांनी थांबून बचावकार्य सुरु केले. सर्व जखमीना बाहेर काढले. इतर सर्व जखमीना शासकीय रुग्णवाहिकेतून सातारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातातील मृतदेहांची उत्तरीय तपासणी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अपघाताची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली.

 

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या रजनी दुर्गुळे यांनी अतिशय कष्टातून संसार सावरला होता. खाजगी गारमेंटमध्ये शिलाईकाम करत त्यांनी दोन मुलांना शिकविले दोन्ही मुले इंजिनियर केली. मोठ्या मुलाचे नुकतेच लग्न झाले आहे, तर दुसरा मुलगा पुण्यात एमबीएचे शिक्षण घेत आहे. त्यांचे माहेर इचलकरंजी असल्याने नातेवाईकांच्यासोबत त्याही उज्जैन येथे देवदर्शनासाठी निघाल्या होत्या, याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. तर चालक सलमान सय्यद हाही आईवडिलांना एकुलता एक असल्याने कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच होती. खाजगी वाहनावर चालक म्हणुन काम करत तो आईवडिलांच्या संसाराला हातभार लावत होता. त्याच्या अपघाती मृत्यूने आईवडिलांवर मोठे संकट कोसळले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -