शहरातील गजबजलेल्या आमराई रोडवरील एका शिक्षकाच्या घरात रात्रीच्या वेळी चोरट्यांनी प्रवेश करून तब्बल सहा लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची घटना उघडकीस आली. घराच्या दोन्ही मजल्यावरील कपाटांची कुलुपे तोडून रोख रक्कम, सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने व चांदीच्या भांड्यांसह सर्व माल चोरट्यांनी चोरून नेला.
चोरटे घराच्या मागच्या बाजूने शेतातून पसार झाले.
याप्रकरणी सतीश गोपाळ कुलकर्णी (वय ६२, रा. सिद्धिविनायक रेसिडेन्सी, हुपरे टर्फ शेजारी, आमराई रोड) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. श्वान घराच्या पाठीमागे जाऊन मोकळ्या शेतात घुटमळले.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कुलकर्णी हे कुटुंबासह गावी गेले होते. त्यामुळे घर बंद असताना सात मे रोजी मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले. घराच्या खालील मजल्यावरील खोलीतील प्लायवूडच्या कपाटाचे दार उचकटून त्यामधून रोख रक्कम २५ हजार रुपये चोरले.
त्यानंतर वरच्या मजल्यावरील त्यांच्या मुलाच्या खोलीतील कपाट उघडून सोन्याचे सुमारे ७१ ग्रॅम वजनाचे नेकलेस, चेन, अंगठ्या व चांदीचे एकूण दोन हजार २०० ग्रॅम वजनाचे तबक, ताम्हण, वाट्या, गुलाबदाणी, लक्ष्मी मूर्ती, निरांजने, तुपाचे ताम्हले आदी साहित्य चोरून नेले. चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावभाग पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, पाटील मळा, टाकवडे वेस मार्गावर रात्रीच्या सुमारास फिरताना तीन संशयित सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यानुसार पोलिसांनी तपास गतिमान केला आहे.
साहित्य टाकले अस्ताव्यस्त
चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून ते थेट पायऱ्यांवर फेकले. घरात घुसून कपाटे उचकटली. त्यातील साहित्यही बेड, सोफासेटवर टाकून सगळे घर अस्ताव्यस्त केले. सोने-चांदीच्या वस्तू अचूक ओळखून चोरून नेल्या.