गडचिरोली सीमेलगतच्या वैनगंगा नदीत आंघोळ करण्यासाठी गेलेले एमबीबीएसचे विद्यार्थी बुडाल्याची माहिती समोर आली आहे. हे तीन तरुण गडचिरोलीचे रहिवासी होते. सुट्टी असल्याने ते वैनगंगा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप पुलरवार अन्य अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.
मिळालेल्या माहितीनुसार, सुट्टी असल्याने आठ मित्र वैनगंगा नदीलगत फिरण्यासाठी गेले होते. त्यांनी पोहण्यासाठी वैनगंगा नदीत उड्या मारल्या. आठ पैकी तीन जण नदीत बुडाले, तर पाच पाण्यातून बाहेर निघण्यात यशस्वी झाले. घटनास्थळी पोहोचून बुडालेल्या तिघांचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली.
बुडालेल्या तरुणांमध्ये गोपाळ गणेश साखरे, पार्थ बाळासाहेब जाधव आणि स्वप्नील उद्धवसिंग शिरे यांचा समावेश आहे. हे तिघेही गडचिरोलीचे रहिवासी असून नागपूरच्या एका मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकत होते. या तरुणांना शोधण्यासाठी शोधकार्य सुरु होते. रात्र झाल्याने शोधमोहीत थांबवण्यात आली आहे.
सुट्टीनिमित्त आठ मित्रांचा ग्रुप वैनगंगा नदीलगत फिरण्यासाठी आला होता. आठही जण नदीत उतरले. काळाने घात केला आणि तीन जण नदीपात्रात बुडाले. हे तीन जण गडचिरोलीचे असून एमबीबीएसच्या प्रथम वर्षात होते. पाण्याचा अंदाज न आल्याने या तरुणांना जीव गमवावा लागला असा अंदाज वर्तवला जात आहे.