मे महिना हा महाराष्ट्रात उन्हाळ्याचा कडाक्याचा काळ मानला जातो. तापमान सरासरीपेक्षा जास्त राहतं, शेतकरी आणि नागरिक पावसाच्या आगमनाची वाट पाहत असतात. पण यावर्षीच्या मे महिन्यात मात्र काहीतरी वेगळं घडत आहे.
महाराष्ट्रात अनेक भागांत मे महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
20 मे रोजी तर पुण्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरुप प्राप्त झाले. अनेक ठिकाणी नुकसानही झाले. मे महिन्यात एवढा पाऊस का पडतोय? हे आपण जाणून घेऊयात.
इतिहासात असं कधी झालंय का?
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नोंदीनुसार, मे महिन्यात महाराष्ट्रात अशा प्रकारचा व्यापक आणि जोरदार पाऊस अत्यंत दुर्मिळ आहे. काही वेळा अपवादस्वरूप एखादी पावसाची झड होते, पण यंदाच्या वर्षी पुणे, नाशिक, मुंबई, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या सर्वच भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. 2010 मध्ये आणि 2004 मध्ये अशाच प्रकारे मे महिन्यात तुरळक पाऊस पडला होता, पण तो इतका व्यापक आणि सातत्यपूर्ण नव्हता.
मे महिन्यात एवढा पाऊस का पडतोय
हवामानतज्ज्ञांच्या मते यंदाच्या मे महिन्यातील या असामान्य पावसामागे अनेक कारणं आहेत:
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे समुद्रातील तापमान वाढल्यामुळे ढगांची घनता वाढते आणि त्यामुळे पर्जन्यवृष्टी होते.
प्री-मानसून एक्टिव्हिटी लवकर सुरू होणे : सामान्यतः जूनच्या सुरुवातीलाच प्री-मानसूनचा प्रभाव दिसतो. पण यावर्षी हवामानात झालेल्या बदलांमुळे प्री-मानसून पावसाला सुरुवात लवकर झाली आहे.
एल-निनो आणि ला-निनाच्या स्थितीत बदल : या जागतिक हवामान घटकांचाही परिणाम स्थानिक हवामानावर होतो. सध्या एल-निनो प्रभाव कमी होत असून, त्यामुळेही वातावरणात आर्द्रता वाढून पाऊस शक्य झाला आहे.
वाढतं शहरीकरण आणि हवामान बदल : मानवनिर्मित कारणांमुळे वातावरणातील अस्थिरता वाढते आणि त्यामुळे अनपेक्षित हवामान बदल दिसून येतात.
शेती आणि सामान्य जनतेवर परिणाम
या पावसाचा दोन्ही प्रकारे परिणाम होऊ शकतो. जिथे हवामान कोरडे असते, तिथे मे महिन्यात पाऊस दिलासा देतो. मात्र काही भागात या वेळच्या पावसामुळे उभ्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. आंबा, केळी, कापूस यांसारख्या पिकांना फटका बसतो. दुसरीकडे, पाण्याची टंचाई भासत असलेल्या भागांमध्ये हा पाऊस वरदान ठरू शकतो.
यंदाचा मे महिना हवामानाच्या दृष्टीने अपवादात्मक ठरत आहे. हा बदल केवळ तात्पुरता की दीर्घकालीन हवामान बदलाची नांदी, हे सांगणे कठीण आहे. मात्र इतकं नक्की – हवामान बदलाची तीव्रता आता प्रत्यक्ष अनुभवास येत आहे. पावसाच्या या असामान्य हजेरीने जनतेने आणि प्रशासनाने सतर्क राहणे गरजेचे आहे.