Monday, July 7, 2025
Homeब्रेकिंगतरूणाची दगडाने ठेचून हत्‍या, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा.

तरूणाची दगडाने ठेचून हत्‍या, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा.

एका २४ वर्षीय युवकाचा विवाह ठरलेला. घरी लग्नाची लगबग सुरू असताना दोन दिवसांआधी तो बेपत्ता झाला. या युवकाची शोधाशोध सुरू झाली. सर्व जण काळजीत सापडलेले. अखेर विवाहाच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या युवकाचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला.

 

मोर्शी तालुक्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

 

धरमू मयतीलाल उईके (२४, रा. पाटनाका, मध्यप्रदेश) असे मृताचे नाव आहे. त्याचा विवाह २३ मे रोजी विवाह ठरला होता. धरमूची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवून आरोपी दयाराम गंजीलाल वरठी (३४, रा. वलनी, ता. मुलताई, जिल्हा बैतूल) याला अवघ्या दोन ते तीन तासांत अटक केली.

 

धरमूचे लग्न मध्यप्रदेश येथील एका मुलीशी ठरले होते व आज त्यांचा विवाह पार पडणार होता. दरम्यान धरमू दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार काल २२ मे रोजी त्याचे वडील मयतीलाल उईके यांनी मोर्शी पोलीस ठाण्यात दिली होती. त्या अनुषंगाने मोर्शी पोलिसांनी तपास सुरू केला होता. आज शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शेतातील विहिरी जवळ रखवालदाराला रक्त दिसून आल्यामुळे त्याने विहिरीत बघितले असता त्याला एक मृतदेह आढळून आला. ही माहिती मोर्शी पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व मृत तरुणाचे प्रेत विहिरीबाहेर काढले. त्याची ओळख लगेच पटली.

 

धरमूच्या डोक्यावर व गालावर जखमा व त्या ठिकाणी रक्ताने माखलेला दगड आढळून आल्यामुळे त्याची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला. लगेच घटनास्थळी अमरावती येथील श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.

 

आरोपी दयाराम वरठी याचे धरमूच्या लग्न ठरलेल्या मुली सोबत प्रेमसंबंध होते. तिचे लग्न धरमूशी होत असल्याने आरोपीने त्याला पाळा येथे बोलावले. मद्यप्राशन करून ते दोघे मोर्शी ते तिवसा मार्गावर असलेल्या कवठाळ शेतशिवारात गेले. आरोपी दयाराम याने धरमूवर दगडाने प्रहार करून त्याला ठार केले आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास प्रभारी पोलीस अधीक्षक पंकज कुमार कुमावत, पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शीचे ठाणेदार नितीन देशमुख करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -