आधी अवकाळी आणि नंतर त्यालाच चिकटलेल्या मान्सूनमुळे महाराष्ट्रात मागील ७ दिवसापासून धुव्वाधार पाऊस पडत आहे. विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान विस्कळीत झालं आहे. रस्त्यांना नदीचे स्वरूप आलं आहे. त्यातच आता पावसामुळे राज्यात 21 जणांचा मृत्यू (Death)झाल्याची माहिती समोर येतेय. पाण्यात बुडून, अंगावर वीज कोसळून, किंवा भिंत पडल्याने लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर १२ नागरिक जखमी सुद्धा झाल्याची माहिती समोर येत आहे.
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे पावसामुळे (Maharashtra Rain) मृत आणि जखमी झालेल्यांबद्दल माहिती जाहीर करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तीन जणींचा मृत्यू झाला. जालन्यात पाण्यात बुडून दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. अहिल्यानगरात भिंत अंगावर पडून २ दोन जण दगावले. मुंबई शहर व उपनगरात झाड पडल्याने २ जणांना जीव गमवावा लागलाय. भंडारा चंद्रपूर वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक जण अंगावर वीज पडल्याने मृत पावल्याचं बोललं जातंय.
आज कस आहे पावसाचं वातावरण? Maharashtra Rain
हवामान विभागानं जारी केलेल्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रातील कोकण आणि उत्तर भाग व्यापल्यानंतर आता थेट मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र व्यापत असून, पुढच्या 24 तासांमध्ये हेच वारे विदर्भाच्या दिशेने धडकणार आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळतील. हवामान विभागाने जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील , पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांवर आभाळ दाटून येत इथंही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर तळकोकणात म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या सरी कोसळतील.