Thursday, July 24, 2025
Homeइचलकरंजीभटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला, सुमारे २० फूट फरफटत नेले; इचलकरंजीतील घटना

भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला, सुमारे २० फूट फरफटत नेले; इचलकरंजीतील घटना

येथील जवाहरनगर परिसरातील व्यंकटेश कॉलनीत एका सहा वर्षीय चिमुकलीवर तीन भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. हल्ल्यामध्ये कुत्र्यांनी सुमारे २० फूट चिमुकलीला फरफटत नेल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.

 

वेदिका तुषार आमले असे तिचे नाव आहे. परिसरातील एका नागरिकाने प्रसंगावधान दाखवत कुत्र्यांना हटकल्याने ती बचावली. आठ दिवसांतील ही दुसरी गंभीर घटना असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे तसेच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणीही होत आहे.

 

शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, महापालिकेने राबवलेली नसबंदीची मोहीम फोल ठरली आहे. दिवसेंदिवस कुत्र्यांचा उच्छाद वाढत आहे. आठवडाभरापूर्वी मराठे मिल कॉर्नर परिसरात शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलीच्या पाठीमागे भटकी कुत्री लागल्याने भयभीत झालेली मुलगी सायकलसह इमारतीच्या तळघरात कोसळून गंभीर जखमी झाली होती. त्यापाठोपाठ बुधवारी जवाहरनगर व्यंकटेश कॉलनी परिसरातील एक महिला आपल्या लहान मुलांना घेऊन रस्त्यावरून चालत निघाली होती. अचानकपणे तीन भटक्या कुत्र्यांनी महिलेसोबत असलेल्या सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला केला.

 

तिचा ड्रेस ओढत खाली पाडून फरफटत नेले. या घटनेत तिच्या पायाला व डोळ्याजवळ ओरबडले आहे. या घटनेमुळे भयभीत झालेल्या महिलेने आरडाओरडा सुरू केला. हे ऐकून तेथे असलेल्या एका नागरिकाने धाव घेत कुत्र्यांना हाकलून लावले. त्यामुळे चिमुकली बचावली. त्यानंतर जखमी चिमुकलीला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलेल्या घटनेचे चित्रीकरण परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये झाले आहे. तो व्हिडीओ समाजमाध्यमांवर सर्वत्र व्हायरल झाला असून, सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

कुत्री मागे लागताच आईची उडाली भंबेरी

 

गावठी कुत्री मुलीच्या मागे लागल्याने दोन मुली आणि एका मुलाला कडेवर घेऊन निघालेल्या आईची भंबेरी उडाली. बघता बघता कुत्र्याने मुलीला ओढून खाली पाडले आणि लचके तोडण्यास सुरुवात केली. परंतु, कडेवर एक आणि हातात एक मूल असल्याने आईची घालमेल वाढली. तिला काय करू सुचेना, असे झाले. तरीही ती कडेवरच्या मुलाला खाली रस्त्यावर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र सीसीटीव्हीत दिसले. दरम्यान, हा गोंधळ ऐकून परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतल्याने अनर्थ टळला. मात्र, तोपर्यंत या घटनेत मुलीला डोळ्याजवळ आणि पायाला गंभीर दुखापत झाली.

 

परिसरात भीतीचे वातावरण

 

जवाहरनगर परिसरात घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच भागात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्वांनी आपापल्या मुलांची काळजी घ्यावी, असे संदेशही समाजमाध्यमांवर फिरत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -