प्रत्येक पुरुषाची इच्छा असते की आपली पत्नी सुंदर असावी. पण कधीकधी असं होणं संकटही ठरतं. होय, उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये सुंदर बायको मिळणं एका तरुणाच्या गळ्यातील फास बनलं. एका तरुणाला त्याच्या सुंदर पत्नीमुळे गावकरी चिडवत होते. वारंवार टोमणे मारल्याने तरुणाला इतका राग आला की तो आपल्या घराच्या छतावर चढला आणि जीव देण्याची धमकी देऊ लागला. ही घटना सिरौली पोलीस स्टेशन परिसरातील चकरपूर गावातील आहे.
गावातील लोक तरुणाला मजेत ‘गुरुदेव’ म्हणून हाक मारायचे. जेव्हा गावकऱ्यांनी त्याच्या पत्नीच्या सौंदर्यावर वारंवार टोमणे मारले आणि खिल्ली उडवली तेव्हा गुरुदेवला खूप वाईट वाटलं. रागाच्या भरात त्याने सांगितलं की आता तो आपला जीव देईल. यानंतर तो थेट घराच्या छतावर चढला आणि खाली उडी मारण्याची धमकी देऊ लागला.
गावात खळबळ, पोलिसांना माहिती
गुरुदेव रागाच्या भरात घराच्या छतावर चढला आणि खाली उडी मारून जीव देण्याची धमकी देऊ लागला. गावात हे कळताच एकच खळबळ उडाली. कुटुंबीय आणि गावातील काही समजूतदार लोकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तरुणाला समजावण्याचा प्रयत्न करू लागले.
पाच तास चालला समजावण्याचा प्रयत्न
पोलीस आणि गावकऱ्यांनी तरुणाला खाली उतरण्यासाठी सतत समजावलं, पण गुरुदेव कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो वारंवार म्हणत होता की आता जगण्याचा काही अर्थ नाही, सगळे त्याची थट्टा करतात. तब्बल पाच तास पोलीस आणि गावकऱ्यांचे समजावण्याचे प्रयत्न सुरू होते.
बचावासाठी गाद्या आणि जाळी
तरुण कधीही खाली उडी मारू शकतो, या भीतीने पोलिसांनी घराखाली गाद्या आणि जाळी लावली. हे सर्व खबरदारी म्हणून करण्यात आलं, जेणेकरून त्याने उडी मारलीच तर त्याचा जीव वाचवता येईल. पोलिसांनी संवादासोबतच शांत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तरुणाचा राग शांत होईल.
अखेर गुरुदेव खाली उतरला
तब्बल पाच तासांच्या मेहनतीनंतर अखेर हा तरुण खाली उतरला आहे. यावेळी तरुण खाली उतरताच लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पोलिसांनी या तरुणाचे समुपदेशन करून त्याला सुरक्षितपणे कुटुंबाच्या ताब्यात सोपवले आहे. पोलिसांनी या प्रकरणात गावकऱ्यांनाही समजावलं की कोणाच्या वैयक्तिक आयुष्याची थट्टा करणं योग्य नाही. छोट्या-छोट्या टवाळक्यांमुळे कधीकधी मोठ्या घटना घडू शकतात. या घटनेनंतर गावकरीही गंभीर दिसले आणि त्यांनी पुढे काळजी घेण्याचं मान्य केलं.