राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे. याच पडताळणीअंतर्गत अनेक महिलांचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात आले आहे. असे असतानाच आता उर्वरित लाडक्या बहिणींसाठी मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हफ्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिलांनी आपापले बँक खाते तपासावे, असे आवाहन केले जात आहे
आदिती तटकरे यांनी दिली माहिती
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून महिलांच्या बँक खात्यात मे महिन्याचे 1500 रुपये टाकण्यात येत आहेत. अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमाही झाले आहेत. तशी माहिती खुद्द महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
आदिती तटकरे यांनी नेमकं काय सांगितलं?
आदिती तटकरे यांनी आपल्या एक्स खात्यावर एक ट्विट केले आहे. याच ट्विटच्या माध्यमातून त्यांनी लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ‘लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू झाले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे, असे तटकरे यांनी एक्सवर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
या महिलांचे नाव होणार बाद
दरम्यान, एकीकडे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत असले तरी दुसरीकडे या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करून ज्या महिलांना लाभ मिळत आहे, त्या महिलांचे नाव लाभार्थी यादीतून काढून टाकले जाणार आहे. सरकारच्या याच धोरणाला विरोधकांकडून विरोध केला जात आहे.