इचलकरंजी येथील शाहू पुतळा परिसरातील एका प्रार्थनेदरम्यान घडलेल्या गोंधळाप्रकरणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्याने आज शिवाजीनगर ठाण्यात तणाव निर्माण झाला.
गुन्हा मागे घेण्यासह पोलिस ठाण्याच्या आवारात धार्मिक प्रार्थना करणाऱ्या संबंधित समाजाच्या जमावावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांना धारेवर धरले. शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी अडीच तास पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारत शिवतीर्थावर उपोषणाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी संबंधित समाजाच्या जमावातील २० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला.
येथे सुरू असलेल्या प्रार्थनेदरम्यान धर्मांतराच्या संशयावरून एका समाजातील महिलांवर हल्ला करून धार्मिक भावना दुखावणाऱ्या आठ जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संजय शामसुंदर आढाव (वय ५४, रा. शाहू पुतळा परिसर, इचलकरंजी) यांच्या फिर्यादीवरून शिवप्रसाद व्यास व त्यांच्यासोबत असलेल्या ७ ते ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. आज सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी वाढली.
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, पोलिस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवून धार्मिक प्रार्थना घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. पोलिसांनी जलदगतीने पोलिस ठाण्यासमोरच्या आवारात जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून विनापरवानगी धार्मिक प्रार्थना घेतल्याप्रकरणी २० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला.
यामध्ये माजी नगरसेवक अब्राहम आवळे, संजय आढाव, दीपा कांबळे, अंकिता कांबळे, संदीप कदम, पवन खोत, संजय बनगे, रिजॉय राजन यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. याबाबतची फिर्याद पोलिस कर्मचारी संतोष धनगर यांनी दिली.