राज्यात ब्रेकनंतर मान्सून आता सक्रीय झाला आहे. राज्यातील अनेक भागांत शुक्रवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने राज्यभरात पावसाचा अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
देशात मान्सून यंदा लवकर दाखल झाला. मे महिन्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन वेळेपूर्वीच झाले. परंतु जून महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने ब्रेक घेतला. त्यामुळे शेतकरी चिंतेत आला होता. हवामान विभागाने 13 जूनपासून राज्यात मान्सून सक्रीय होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार आता राज्यात मान्सून सक्रीय झाल्याचे दिसत आहे. शुक्रवारी सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण आहे. मुंबईतील काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी गुरुवारी रात्री देखील पाऊस झाला. पुणे शहरात गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली. या पावसामुळे पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरातील सखल भागात पाणी साचले. शुक्रवारी सकाळीसुद्धा पावसाचे वातावरण आहे.
तळ कोकणातला पाऊस आता जोर धरणार आहे. पुढचे 48 तास कोकणातील तीन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही पाऊस सक्रीय झाला आहे. आजपासून पुढील तीन दिवस या भागात पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. एकंदरीत राज्यात 13 जूनपासून 17 जूनपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
मराठवाडा, विदर्भातही अनेक भागांत पाऊस सुरु आहे. जालनामधील मंठा शहरात पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली उभ्या असलेल्या 42 वर्षीय गौतम जाधव यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जालनामध्ये मध्यरात्री वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.