Wednesday, June 25, 2025
Homeकोल्हापूरगॅस गिझरच्या गळतीमुळे नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू

गॅस गिझरच्या गळतीमुळे नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यात दोन हृदयद्रावक घटनांनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आजरा तालुक्यातील भावेश्वरी कॉलनी येथे गॅस गिझरच्या गळतीमुळे अवघ्या महिनाभरापूर्वी विवाहबद्ध झालेल्या नवदांपत्याचा गुदमरून मृत्यू झाला.

 

सागर सुरेश करमळकर (वय 32) आणि सुषमा सागर करमळकर (वय 26) असे या नवविवाहित जोडप्याचे नाव आहे. रविवारी आंबोली येथे फिरून परतल्यानंतर त्यांनी स्नानासाठी गॅस गिझर सुरु केला असावा. सोमवारी सकाळपर्यंत त्यांचा फोन उचलला गेला नाही. कालांतराने फोन स्विच ऑफ झाल्याने नातेवाईकांनी त्यांच्या घरात जाऊन पाहणी केली असता बाथरूममध्ये दोघांचेही मृतदेह आढळून आले. संपूर्ण घरात गॅसचा वास असल्यामुळे गॅस गिझरमधून झालेल्या गळतीने गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सागरच्या पश्चात त्याची आई आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

 

दरम्यान, ‘फादर्स डे’ दिवशी घडलेली दुसरी एक दुर्दैवी घटना उजळाईवाडी (ता. करवीर) येथील आहे. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने झालेल्या अपघातात रोहित सुधीर माने (वय 35) आणि त्याचा चार वर्षांचा मुलगा विहान माने यांचा मृत्यू झाला. रोहितची पत्नी शमिका माने या गंभीर जखमी असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोहित हे शालेय जीवनात नावाजलेले क्रिकेटपटू होते आणि सध्या पुण्यातील आयटी कंपनीत कार्यरत होते. ते चिंचवड येथे पत्नी व मुलासह स्थायिक झाले होते. ‘फादर्स डे’च्याच दिवशी बाप-लेकाचा अपघातात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

या दोन्ही दुर्दैवी घटनांमुळे कोल्हापूर परिसरात शोकाची लाट पसरली आहे. एकीकडे नवविवाहित दाम्पत्याचा आकस्मिक मृत्यू, तर दुसरीकडे एका कुटुंबाचा ‘फादर्स डे’ला झाला दुर्दैवी अंत, यामुळे जनमानस हेलावून गेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -