भूस्खलनाचा गंभीर धोका, दरड कोसळणे अथवा रस्ता खचण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारी म्हणून आंबा घाटातून आज दुपारपासून एस. टी. वाहतूक बंद केली आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी आदेश जारी केला आहे.
एस. टी. अवजड वाहनांत समावेश असल्याने व धोकादायक स्थितीत वाहतूक नको म्हणून हा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर कळे, बाजार भोगाव, अणुस्कुरा मार्गे पाचल, रत्नागिरी व गगनबावडा तळेरे मार्गे मुंबई, गोवा, रत्नागिरी असा कोकणाकडे जाण्यासाठी एसटीचा मार्ग वळविला आहे.
घाटातील परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत घाटातील दळणवळण जड वाहतुकीसाठी बंद राहील, असे आदेशात म्हटले आहे. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने घाटातील ओझरे खिंडीत भूस्खलनासह रस्त्याला तडे गेल्याने वाहतुकीसाठी धोका निर्माण झाला आहे.
प्रवाशांच्या जीवितास संभाव्य धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने या मार्गावरील सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीस तातडीने पूर्णबंदी घातली आहे. आंबा घाटातील किमी ६७.१४० ते ७४.६०० दरम्यानचा महामार्ग धोकादायक स्थितीत पोहोचला आहे. विशेषतः ६९.५०० ते ६९.७०० या खोल दरीलगतच्या भागात रस्त्याची धूप झाली असून भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.


