अंडर 19 टीम इंडियाचा स्टार आणि ओपनर बॅट्समन वैभव सूर्यवंशी सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात अंडर 19 इंग्लंड टीम विरुद्ध 5 सामन्यांची यूथ वनडे सीरिज खेळत आहे. भारताने या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडवर धमाकेदार विजय मिळवला. त्यानंतर यजमान इंग्लंडने दुसऱ्या सामन्यात पलटवार करत पहिल्या पराभवाची परतफेड केली. इंग्लंडने यासह मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. वैभवने या दोन्ही सामन्यात चाबूक बॅटिंग केली. मात्र दोन्ही सामन्यात वैभव अर्धशतक करण्यात अपयशी ठरला. मात्र वैभवने आता तिसऱ्या सामन्यात दोन्ही सामन्यांची भरपाई केली आहे.
वैभव सूर्यवंशी याची तुफानी खेळी
वैभवने इंग्लंड विरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना झंझावाती खेळी केली आहे. वैभव या सामन्यात शतक करण्यात अपयशी ठरला. मात्र वैभवने स्फोटक खेळी करत चाहत्यांची मनं जिंकली. वैभवने फक्त 31 बॉलमध्ये 277.42 च्या स्ट्राईक रेटने 86 रन्स केल्या. विशेष म्हणजे वैभवने यापैकी 78 धावा या फक्त चौकार-षटकारांच्या मदतीने पूर्ण केल्या. वैभवने या खेळीत 9 गगनचुंबी षटकार आणि 6 चौकार ठोकले.
टीम इंडियाची आश्वासक सुरुवात
नियमित कर्णधार आयुष म्हात्रे या सामन्यात खेळत नाहीय. त्यामुळे अभिज्ञान कुंडु याच्याकडे नेतृत्वाची धुरा देण्यात आलीय. पावसामुळे या सामन्यातील 10 षटकं कमी करण्यात आली. इंग्लंडनेने 40 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 268 धावा केल्या. त्यानंतर अभिज्ञान आणि वैभव या सलामी जोडीने 4 ओव्हरमध्ये 38 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर अभिज्ञान 12 धावा करुन आऊट झाला.
टीम इंडिया जिंकणार का?
अभिज्ञान आऊट झाल्यानंतर वैभवने टॉप गिअर टाकला. वैभवने विहान मल्होत्रा याच्यासह 23 चेंडूत 73 धावांची भागीदारी केली. मात्र वैभव 8 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर आऊट झाला. वैभवला शतक करण्याची संधी होती. मात्र वैभवने वैयक्तिक विक्रमाची पर्वा न करता टीम इंडियाला विजय मिळवून देण्यासाठी झंझावाती खेळी साकारली. आता भारताला विजयी करण्याची जबाबदारी इतर फलंदाजांच्या खांद्यावर आहे. उर्वरित फलंदाज भारताला मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवून देण्यात यशस्वी ठरतात की नाही? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.