आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक भुसार बाजारात साबूदाणा, भगर व शेंगदाण्याला मागणी वाढली आहे. मात्र, यंदा उत्पादन चांगले असल्याने राज्यासह परराज्यांतून बराच माल बाजारात दाखल होत आहे.
मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने गतवर्षीच्या तुलनेत दरात पाच ते दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे.
तामिळनाडू येथील सेलम जिल्ह्यातून पुण्यातील बाजारात साबूदाणा विक्रीसाठी दाखल होतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्रातून साबुदाण्याची मागणी वाढेल, अशी शक्यता धरून सेलम जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात साबूदाणा पाठविण्यात येत आहे. येथील बाजारात दररोज 100 ते 125 टन साबूदाणाची आवक होत आहे. आवकही नेहमीच्या तुलनेत जास्त आहे.
मार्केट यार्डात नाशिक जिल्ह्यातून भगरीची दररोज 50 टनांची आवक होत आहे. यंदा मागणीच्या तुलनेत उत्पादन जास्त असल्याने सर्व जिनसांच्या दरात गतवर्षीपेक्षा पाच ते दहा टक्क्यांनी घट झाल्याची माहिती मार्केट यार्डातील साबूदाणा-भगरीचे व्यापारी अशोक लोढा यांनी दिली.
आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेशातून शेंगदाणा बाजारात
शेंगदाण्याला मध्यम स्वरूपाची मागणी असून, बाजारात दररोज 100 टन माल दाखल होत आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश येथून आवक होत आहे. स्पॅनिशच्या चांगल्या मालाला घाऊक बाजरात किलोला 115 ते 117 रुपये, घुंगरूला 95 ते 103 रुपये, शेंगदाणा 1 नंबरला 100 ते 102 रुपये, 2 नंबरला 97 ते 100 रुपये आणि 3 नंबरला 92 ते 95 रुपये भाव मिळत आहे. आषाढी एकादशीच्या तुलनेत मागणी कमी असल्याचे मार्केट यार्डतील व्यापार्यांकडून सांगण्यात आले.
घाऊक बाजारातील किलोचे भाव
साबूदाणा 1…………….50 ते 54
साबूदाणा 2…………….47 ते 52
साबूदाणा 3…………….43 ते 50
भगर……………………100 ते 110
– आशिष दुगड, साबूदाणा-भगरीचे व्यापारी, मार्केट यार्डउपवासाच्या काळात खिचडी तसेच भगर आवर्जून खाल्ली जाते. त्या अनुषंगाने आषाढी एकादशीसाठी दरवर्षी मार्केट यार्डात साबूदाणा, भगर, शेंगदाण्याला मोठी मागणी असते. मात्र, यंदा नेहमीच्या तुलनेत उत्पादन जास्त आहे. त्यामुळे, दरात घसरण झाली असून, दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत.