अदानी ग्रुप लवकरच आणखी एक मोठे अधिग्रहण करण्याच्या तयारीत आहे. बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या माहितीनुसार, अदानी ग्रुपने दिवाळखोरीत सापडलेल्या जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड (JAL) या कंपनीसाठी तब्बल 12,500 कोटी रुपयांची बोली लावली असून, या शर्यतीत अदानी सध्या आघाडीवर असल्याची माहिती आहे.
अॅडव्हान्स पेमेंट देण्यासही तयार
सूत्रांच्या माहितीनुसार, अदानी ग्रुपने 8,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आगाऊ पैसे देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळेच ते अन्य स्पर्धकांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत. या स्पर्धेत डालमिया ग्रुप, जेएसपीएल (नवीन जिंदाल), वेदांत आणि पीएनसी इन्फ्राटेक यासारख्या कंपन्यांचाही समावेश आहे.
JAL बहुआयामी कंपनी
जयप्रकाश असोसिएट्स ही कंपनी सिमेंट, रिअल इस्टेट, वीज, हॉटेल्स आणि खत उद्योगात कार्यरत आहे. JAL कडे 10 दशलक्ष टन क्षमतेचा सिमेंट प्लांट, पाच हॉटेल्स, खत कारखाना, तसेच नोएडा एक्सप्रेसवे आणि बुद्ध इंटरनॅशनल सर्किटजवळील 2500 एकर जमीन आहे.
मोठ्या कर्जामुळे दिवाळखोरीत
JAL सध्या आर्थिक संकटात असून, इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड (IBC) अंतर्गत प्रक्रिया सुरू आहे. कंपनीवर पंजाब नॅशनल बँक आणि IDBI बँकसह 25 बँकांचे मिळून 48,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज 12,700 कोटी रुपयांना राष्ट्रीय मालमत्ता पुनर्निर्माण कंपनी (NARCL) ला विकण्यात आले आहे.
अदानी ग्रुपचा मोठा डाव
अदानी ग्रुपने अलीकडच्या काळात सिमेंट आणि रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. JAL खरेदी केल्यास, मध्य आणि उत्तर भारतात त्यांच्या उपस्थितीत लक्षणीय वाढ होईल. JAL च्या शेअरची सध्याची किंमत सुमारे 3 रुपये असून, त्यावर “ट्रेडिंग रिस्ट्रिक्टेड”चा टॅग आहे. अदानीकडून झालेल्या संभाव्य अधिग्रहणामुळे या शेअरमध्ये हालचाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही