राज्यात यंदा मान्सूनच आगमन वेळेपूर्वीच झालं, राज्यात मान्सून सामान्यपणे 7 जून रोजी दाखल होतो, मात्र यंदा मान्सूनने वेळेपू्र्वीच म्हणजे 25 मे रोजीच एन्ट्री केली होती. त्यानंतर काही दिवस चांगला पाऊस झाला, मात्र मध्येच पावसात खंड पडला.
दरम्यान आता मोठी बातमी आहे, ती म्हणजे हवामान विभागानं पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे.
हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांमध्ये कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गा या जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.
याच काळात राज्यात जोरदार वारं देखील वाहणार आहे, वाऱ्याचा वेग प्रति तास 45 ते 55 किमी असू शकतो, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान दुसरीकडे मराठवाड्यात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
विदर्भातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे, विदर्भात पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातही हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला आहे, उत्तर महाराष्ट्रात काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.