आदिवासी भागातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे अनेक भागात आरोग्य सेवेच्या नावाखाली बाबा बुवाकडे जाण्याचा प्रकार घडत असतो. यंदा एक चिमुरडा याचा बळी ठरला आहे.
या बाळावर अघोरी उपचार करण्यात आले असून या प्रकरणात एका महिलेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
मेळघाटातील दहेंद्री गावात एका दहा दिवसाच्या बाळाला गरम विळ्याने पोटावर चटके दिल्याचं समोर आलं आहे. या बाळाला पोटफुगीचा त्रास होत होता. त्यावर उपार करण्यासाठी पालक गावातील एका वृद्ध महिलेकडे गेले. तिने पोटफुगीवर बाळाला गरम विळ्याने तब्बल 39 चटके दिल्याचं उघड झालं आहे.
दहा दिवसांनी आला हा गंभीर प्रकार उघडकीस आला. यानंतर तातडीने बाळाला अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचार घेतल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आलं. सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे. अशा प्रकारे चटके दिल्याने पोटफुगी कमी होते, अशी मेळघाटात अंधश्रद्धा आहे. चार महिन्यापूर्वीही एका 22 दिवसाच्या बाळाला अशाच प्रकारे पोटावर चटके देण्यात आले होते.