राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणार्या मुसळधार पावसामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पाणी सात स्वयंचलित दरवाजाजवळ येऊन पोहोचले असून, धरण 80 टक्के भरले आहे
मे महिन्यातच धरणात भरपूर जलसाठा झाल्याने हे धरण लवकर भरले असून, ही घटना ऐतिहासिक ठरत आहे.
यापूर्वी कधीही एवढ्या लवकर धरण भरल्याची नोंद नाही. धरणातून 3100 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत असल्याने नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. सोमवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांमध्ये 89 मि.मी. पाऊस झाला, तर जूनपासून आजअखेर 2234 मि.मी. पाऊस झाला आहे.
मे महिन्याच्या 20 तारखेला पावसाने दमदार सुरुवात केली. धरणामध्ये पाणीसाठा शिल्लक राहिला. त्यामुळे पंचगंगा नदीतील को.प. बंधार्यातील बरगे काढण्यास अडचण निर्माण झाली. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये बरगे काढून धरणातून 2500 क्युसेक विसर्ग चालू केला. धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला असून, पावसाचा अंदाज घेत विसर्ग वाढवला आहे. सध्या धरणातून 3100 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे.
शेतकर्यांसाठी ही बाब विशेषतः सकारात्मक असून, खरीप हंगामातील सिंचनासाठी भरपूर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. धरणातून जलविद्युत निर्मितीही केली जाते. त्यामुळे आगामी काळात वीज उपलब्धतेत वाढ होणार आहे.