आटपाडी तालुक्यातील एका गावात येथे अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे. चार तरुणांच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तिने गळफास घेतल्याचे मंगळवारी पोलिस तपासात उघड झाले आहे.
संशयितांपैकी एकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचीही नोंद पोलिस दप्तरी करण्यात आली आहे.
याप्रकरणी राजू विठ्ठल गेंड, रामदास गायकवाड, रोहित सर्जेराव खरात आणि अनिल नाना काळे यांच्यावर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पैकी रामदास गायकवाड याला संतप्त ग्रामस्थांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत. राजू गेंड यालाही पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, ग्रामस्थांनी या घटनेच्या निषेधार्थ गावात कडकडीत बंद पाळला. तसेच पोलिसांच्या भूमिकेच्या निषेधार्थही दिवसभर पोलिस ठाण्यासमोर तळ ठोकला होता.
पोलिस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलगी कुटुंबासोबत शेतात राहत होती. ती गावातच माध्यमिक शाळेत शिकत होती. तिने घरात सोमवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याआधी रात्री मुलीने वडिलांना मुलांकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली होती. दुसऱ्या दिवशी ते तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात जाणार होते. मात्र, त्याआधीच तिने घरात गळफास घेतला. पोलिस निरीक्षक विनय बहिर, पोलिसांनी भेट देऊन घटनास्थळी पंचनामा केला व आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर लैंगिक अत्याचार केल्याचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा चौघांवर गुन्हा दाखल केला. त्यातील दोघे पसार असून, एकाला अटक केली आहे, तर एकावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शाळेला येता आणि जाता हे तरुण तिचा पाठलाग करत होते. शारीरिक, मानसिक त्रास देत होते. तसेच मोबाईलवर संपर्क साधून त्रास देत होते. त्यामुळे मुलगी अस्वस्थ होती. यातील राजू विठ्ठल गेंड हा तिच्यावर दबाव टाकून शरीरसुखाची मागणी करत होता. ती तिने धुडकावली होती. त्यानंतर तिच्यावर अधिक दबाव वाढवला. राजू गेंड याने जबरदस्तीने तिला एका गावातील खोलीवर नेत अत्याचारही केला होता. त्याचा एकाने व्हिडिओ बनवला होता. तिला त्याची भीती दाखवली जात होती. त्यामुळे भयभीत होऊन ती तणावाखाली वावरत होती. या तरुणांचा त्रास वाढतच चालला होता. रविवारी रात्री तिने जेवताना पालकांना तिला होणाऱ्या त्रासाची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी ते पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार होते. मात्र, त्याआधी तिने गळफास घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेचे गावात तीव्र पडसाद उमटले. सर्वच स्तरातून तीव्र निषेध करण्यात आला. गावकऱ्यांनी दिवसभर कडकडीत बंद पाळला. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्याने ग्रामस्थांनी दिवसभर पोलिस ठाण्यासमोर तळ ठोकला होता.
बेकरी बनली टवाळखोरांचा अड्डा
मुख्य आरोपी राजू गेंड याची गावात बेकरी आहे. तिथे चौघांची रोजची उठबस असते. ही बेकरी त्यांचा अड्डाच बनला होता. गावात त्यांचा टवाळखोरांचा ग्रुप झाला होता. अल्पवयीन मुलींना त्यांनी त्रास दिल्याची वारंवार तक्रार होती. बदनामीच्या भीतीने तक्रारीसाठी कोणी पुढे येत नव्हते. त्यामुळेच त्यांचे धाडस वाढले होते.