गुरुग्राममध्ये टेनिस खेळाडू राधिका यादवची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे राधिकाच्या वडिलांनीच तिच्यावर गोळी झाडली. ही घटना गुरुग्रामच्या सुशांत लोक-2 येथील त्यांच्या निवासस्थानी घडली. पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. राधिकाच्या वडिलांनी तिला गोळी का मारली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.l
नेमकं काय घडलं?
राधिका आणि तिचे वडील एकाच घरात राहात होते. सुशांत लोक येथील राहत्या घरात वडिलांनी गोळी घातल्यानंतर राधिकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर अवस्थेत असलेल्या राधिकाला हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले. मात्र, या घटनेमागील खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ही घटना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सेक्टर 57 येथील त्यांच्या निवासस्थानी घडली, जिथे राधिका आपल्या कुटुंबासह राहत होती. आरोपी वडिलांनी आपली मुलगी राधिकावर सलग तीन गोळ्या झाडल्या. गुरुग्राम पोलिसांनी हत्येचा आरोपी असलेल्या वडिलांना अटक करून घटनास्थळावरून ती रिव्हॉल्व्हर जप्त केली.
नेमकं कारण काय?
राधिका ही राज्यस्तरीय टेनिस खेळाडू होती आणि तिने अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रील बनवण्यावरून राधिका आणि तिच्या वडिलांमध्ये वाद झाला होता. हा वाद इतका टोकाला गेला की राधिकाच्या वडिलांनीच तिच्यावर तीन गोळ्या झाडल्या.