गणेशोत्सव अगदी तोंडावर आला असताना आता महाराष्ट्रातील गणेशभक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. गणेशोत्सव या सणाला महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित करण्यात आलं आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी विधानभवनात याबाबत घोषणा केली आहे. भाजपाचे कसबा पेठचे आमदार नारायण रासने यांनी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना आशिष शेलार यांनी हि मोठी घोषणा केली आहे.
गणेशोत्सवासाठी कोणत्याही प्रकारे आडकाठीचे असणार नाही- Ganeshotsav
आशिष शेलार म्हणाले, महाराष्ट्राचा गणेशोत्सव 1893 रोजी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरित्या सुरु केला. घऱोघरी तो सुरु होताच. त्याची एक पार्श्वभूमी सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित होतं आणि त्याच पद्धतीन चालू आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव उत्सव म्हणून घोषित करेल हे मी आजच स्पष्ट करतो. तसेच पीओपी (POP) मूर्तींवरील निर्बंध हटवण्यात आले असून, विसर्जन परंपरागत पद्धतीनेच व्हावे, असे धोरण सरकार न्यायालयासमोर मांडत आहे. राज्य सरकारचे धोरण गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) कोणत्याही प्रकारे आडकाठीचे असणार नाही,” असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं. सरकारच्या या घोषणेमुळे राज्यातील गणेश मंडळांमध्ये आणि गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उद्धव ठाकरेंवर निशाणा –
गणेशोत्सवाला (Ganeshotsav) महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित करत असताना आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला. काही लोकांनी वेगवेगळ्या कारणाने गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या न्यायालयात केला. पण महायुतीच्या सरकारने या सर्व निर्बंधांना बाजूला केलं. 100 वर्षाच्या परंपरेला खंडित कोणी केला असेल तर तेव्हाच्या मुख्यमंत्री यांनी केले. लालबागचा राजा देखील एक वर्ष बसला नाही. ही भूमिका तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली, असा टोला आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. आता ठाकरे गटाकडून यावर काय प्रत्युत्तर येत ते बघायला हवं.