नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मेफेंटरमाइन सल्फेट या प्रतिबंधित इंजेक्शनचा साठा करून ठेवणाऱ्या तिघांना गावभाग पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ५२ इंजेक्शनचा साठा, ६० हजार रूपये रोकड, तीन मोबाईल आणि दोन मोटारसायकल असा सुमारे २ लाख ३६ हजार ९६४ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये संग्राम अशोकराव पाटील (वय २९, रा. वृंदावन
अपार्टमेंट, इचलकरंजी), सचिन सुनिल मांडवकर (वय २५, रा. यशवंत कॉलनी, इचलकरंजी), अभिषेक गोविंद भिसे (वय २५, रा. लालनगर इचलकरंजी) यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी
अटक करण्यात आलेल्या संशयितांना न्यायालयात घेऊन जात असताना पोलीस कोल्हापूर जिल्ह्यात ‘मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गावभाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही लोक नशा करण्यासाठी प्रतिबंधित असलेले मेफेंटरमाइन सल्फेट हे इंजेक्शन विक्री करीत असलेची माहिती डीवायएसपी समिरसिंह साळवे इचलकरंजी यांचे मार्फत मिळाली. त्यानुसार गावभाग पोलिसांनी प्रतिबंधित इंजेक्शनचा साठा बाळगणाऱ्या संशयित आरोपी संग्राम अशोकराव पाटील याच्या श्रीपादनगर येथील वृंदावन अपार्टमेंट परिसरातील घराबाहेर सापळा रचून पहाणी केली. तेव्हा संग्राम पाटील याचे घरातून एक संशयित इसम बाहेर पडला. त्यास पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे मेफेंटरमाईन सल्फेट या प्रतिबंधित इंजेक्शनच्या एकूण ५ बॉटल मिळून आल्या. चौकशीत त्याचे नाव सचिन सुनिल मांडवकर असे असल्याचे सांगितले. त्यानंतर लागलीच संग्राम पाटील याच्या घरी शोध घेतला असता आणखी इंजेक्शनच्या १८ बॉटलचा साठा मिळून
आला.
त्यानंतर संग्राम पाटील व सचिन मांडवकर यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी लालनगर येथील अभिषेक गोविंद भिसे याचेकडे देखील या इंजेक्शनचा साठा असल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या दोघांनी अभिषेक यास सदर प्रतिबंधीत इंजेक्शन घेवून येण्यास सांगितले. तेव्हा अभिषेक यास पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्याचेकडे इंजेक्शनच्या ७ बॉटल मिळून आल्या. त्यांनंतर त्याच्या घरात शोध घेतला असता आणखी २२ बॉटल मिळून आल्या. तसेच साठ हजार रूपये रोख रक्कम मिळून आली.
सदर कारवाई एकूण इंजेक्शनच्या ५२ बॉटल किंमत २१ हजार ९६४, साठ हजार रूपये, तीन मोबाईल किंमत ४५ हजार रूपये तसेच दोन मोटारसायकल किंमत १ लाख १० हजार असा एकूण २ लाख ३६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित संग्राम पाटील, सचिन मांडवकर, अभिषेक भिसे यांचेवर गुन्हा दाखल करणेत आला असून या
गुन्हेगारी साखळीतील अन्य संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या तिघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.
नशेच्या इंजेक्शन अथवा अंमली पदार्थांचे सेवन किंवा विक्रीच्या बाबतीत कोणतीही माहिती प्राप्त झालेस पोलीसांना गोपनीय माहीती देवून मिशन झिरो ड्रग्ज हे अभियान यशस्वीरित्या राबवण्यासाठी व अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन गावभाग पोलिसांनी केले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनाखाली गावभाग ठाणेकडील पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक पूनम माने, गुन्हे शोध पथकातील पो. हवा. अनिल पाटील, सुनिल पाटील, पो.ना. फिरोज बेग, पोलीस अंमलदार अमर शिरढोणे, बाजीराव पोवार, आदित्य दुंडगे, ताहीर शेख, पो. हवा इंगवले यांनी सदरची कारवाई केली.