शहरातील तब्बल 4 लाख 60 हजारांहून अधिक घरांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 8 हजार घरांच्या परिसरात डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. तर, तब्बल 3 हजार 159 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, एकूण 16 लाख 92 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात डेंगी, मलेरिया यांसारख्या डासजन्य आजारांना अटकाव करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने विविध प्रकाराची कार्यवाही केली जात आहे. औषध फवारणीपासून ते थेट दंडात्मक कारवाईपर्यंत आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. कारवाईचा बडगा वाढविण्यात आला आहे. तसेच, जनजागृती केली जात आहे.
घरांपासून औद्योगिक व बांधकाम स्थळांपर्यंत सखोल तपासण्या सुरू असून, यामध्ये डासाच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरणार्या घटकांचा शोध घेऊन त्वरित कारवाई केली जात आहे. शहरातील तब्बल 4 लाख 60 हजारांहून अधिक घरांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 8 हजार घरांच्या परिसरात डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत.
एकूण 24 लाख 5 हजार कंटेनर तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 9 हजार 200 कंटेनरमध्ये डास वाढीस पोषक स्थिती आढळून आली आहे. शहरातील एकूण 1 हजार 66 भंगार दुकाने आणि 1 हजार 481 बांधकाम स्थळांची पाहणी आरोग्य विभागाच्या पथकामार्फत करण्यात आली आहे. तब्बल 3 हजार 159 आस्थापना, बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार व व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर, शहरा विविध 501 ठिकाणी थेट दंड करीत एकूण 16 लाख 92 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा
महापालिकेकडून डासांच्या उत्पत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. डेंगी, मलेरियासारख्या आजारावर मात करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. घर आणि आजूबाजूला पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.