मुंबई लोकल ट्रेन (Mumbai Local Train) म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईन.. रोज सकाळी उठायचं आणि लोकलने कामावर जायचं हा मुंबईकरांचा नित्यक्रम.. लोकल ट्रेनच्या गर्दीत शिरून, उभा राहून कसा तरी हा मुंबईकर कर्मचारी ऑफिसवर पोचतो आणि जणू सुटकेचा निश्वास सोडतो. सकाळी ऑफिसच्या वेळेतच लोकल ट्रेनला गर्दी असल्याने अनेकांना जाग मिळत नाही, परिणामी ऑफिसवर पोहचायला उशीर होतो.. लोकल ट्रेनमधील हीच गर्दी रोखण्यासाठी आता राज्य सरकारने एक उपाय काढला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना त्याच्या कार्यालयात ३० मिनिटांपर्यंत उशिरा पोचण्यास आता मुभा देण्यात आली आहे. म्हणजेच काय तर ऑफिसच्या ठरलेल्या वेळेपेक्षा ३० मिनिटे उशिरा जरी पोचलं तरी चालेल. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी याबाबतची घोषणा विधानसभेत केली आहे.
विधानसभेत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईतील वाढत्या लोकल अपघातांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना प्रताप सरनाईक म्हणाले, मुंबईतील सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात अर्धा तास म्हणजे ३० मिनिटांनी उशिरा पोचले तरी चालेल. मात्र सकाळचा हा अर्धा तास सदर सरकारी कर्मचाऱ्यांना संध्याकाळी भरून काढावा लागेल. म्हणजेच काय तर त्यांच्या कामाच्या तासांत कोणताही बदल होणार नाही. कार्यालयातील गर्दी कमी करणे. तसेच मुंबईतील रेल्वे व्यवस्थेवरील ताण कमी करणे. हे या निर्णयामागचे उद्दिष्ट आहे. तसेच राज्यातील मंत्री प्रवाशांना मेट्रो ट्रेन आणि इतर सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायी पद्धती वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत अशी माहितीही प्रताप सरनाईक यांनी दिली.
कार्यालयीन वेळेत बदल करणे हा किरकोळ बदल जरी वाटत असला तरी, लाखो प्रवाशांना रोजच्या प्रवासादरम्यान दिलासा मिळू शकतो. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही अशाच प्रकारच्या वेळेच्या नियोजनाचा विचार सुरु आहे. त्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन केली जाईल, असंही सरनाईक म्हणाले.
दरम्यान, मुंबई लोकलवरील ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबईत अनेक मार्गावर मेट्रो कार्यरत असताना आणि नवनवीन रस्ते उभारूनही लोकल मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्तच आहे. खास करून सकाळच्या वेळेस, म्हणजे ऑफिसला किंवा कॉलेजला जाताना मुंबई लोकलचे डब्बे खचाखच भरलेले असतात. वाढत्या गर्दीमुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. मध्य रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयाला सादर केलेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार, गेल्या 8 वर्षात तब्बल 8273 प्रवाशांचा लोकल मधून प्रवास करताना मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे २०२५ च्या पहिल्या केवळ पाच महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते मे अखेरपर्यंत ४४३ मुंबईकरांनी रेल्वे रुळ ओलांडताना आणि धावत्या लोकल ट्रेनमधून पडून आपला जीव गमावला आहे.