तरडगाव, ता. फलटण येथील ग्रीन फिल्ड या कंपनीमध्ये प्रादेशिक विक्री व्यवस्थापक या पदावर कार्यरत असताना कंपनीच्या घेतलेल्या मालाची 48 लाख 90 हजार 797 रुपये इतकी रक्कम कंपनीला न दिल्याने कंपनीची फसवणूक करणार्या संशयिताला लोणंद पोलिसांनी अटक केली आहे.
संदीप रामचंद्र खरात (वय 40, रा. जळगाव) असे संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दि. 21 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संशयित संदीप खरात हा ग्रीनफील्ड कंपनीत विक्री व्यवस्थापक पदावर काम करत होता. त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रतिभा ऍग्रो या नावाने कंपनीचा एकूण 51 लाख 07 हजार 797 रुपये किमतीचा माल घेऊन त्यापैकी 2 लाख 17, हजार इतकी रक्कम कंपनीला देऊन उर्वरित रक्कम एक महिन्यानंतर देतो असे सांगितले. मात्र, अद्यापपर्यंत कंपनीच्या घेतलेल्या मालाची 48 लाग 90 हजार 797 रूपये ही रक्कम न देता फसवणूक केली. त्यामुळे खरात याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी संशयिताच्या शोधासाठी पथके रवाना केली. त्याच्या तांत्रिक माहितीच्या आधारे संशयिताला छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक पोलीस ठाणे हद्दीतून अटक केली.
सपोनि सुशिल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण, देवेंद्र पाडवी, हवालदार प्रविण मोरे, धनाजी भिसे, पोना बापुराव मदने, शेखर शिंगाडे, सुनिल नामदास, अमोल जाधव, अंकुश कोळेकर, विठठल काळे यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.