ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा केले जातात. सरकारची ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे, मात्र सध्या या योजनेच्या निकषात ज्या महिलांची नावं बसत नाहीत, त्या महिलांची नावं या योजनेतून वगळण्याचं काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अगोदरच सांगितले होते, ज्यांच्याकडे गाड्या आहेत, बंगले आहेत त्यांच्यासाठी ही योजना नाही. योजना ही नेहमी गरिबांसाठी असेत, ही योजना श्रीमंतांसाठी नसते. मी पण सांगितलं होतं की, ज्या महिला नियमांमध्ये बसत नाही, त्यांनी स्वतःहून सांगावं मी या नियमांमध्ये बसत नाही. एवढे करूनही ही मंडळी या योजनेचा लाभ घेत असतील तर ते अडचणीचं आहे. अजूनही गाडी बंगले असतील त्यांनी या लाडक्या बहीण योजनेतून माघार घ्यावी. योजनेत बसत नसतानाही ज्यांनी लाभ घेतला त्यांच्यावर अजून काही कारवाई होऊ नये यासाठी मी प्रयत्न करेल. जे या नियमांमध्ये बसत नाही, त्यांनी कृपा करून थांबावे. खरोखरच त्यांना आवश्यकता आहे त्यांना न्याय मिळेल, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
हनी ट्रॅपवर प्रतिक्रिया
दरम्यान सध्या राज्यात हनी ट्रॅपलचा मुद्दाही चांगलाच गाजत आहे, यावर देखील भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टपणे सांगितले आहे, हनी आणि ट्रॅप काहीही नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व गृहमंत्री देखील आहेत. सीडी बिडी काही असतील तर त्या पोलिसांकडे द्याव्यात, त्यावर पोलीस चौकशी करतील, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. सीडीमुळे शिंदे सरकार आलं, सत्तापालट झाला असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता, यावर प्रतिक्रिया देताना यावर मी सहमत नाही असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.