गेल्या काही दिवसांपासून देशातील काही भागात पावसाने उघडीप घेतली होती, मात्र आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. हवामान विभागाने दिल्ली एनसीआरमध्ये वादळी वाऱ्यांसह आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी राजधानीत झालेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे मात्र रस्त्यांवर पाणी साचल्याने लोकांना त्रासाचा सामना करावा लागला होता.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली एनसीआरमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच शहराते कमाल आणि किमान तापमान 35 आणि 26 अंश राहण्याची शक्यता आहे. 21 जुलै रोजीही वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या राजधानीत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. 20 ते 26 जुलै रोजी पश्चिम बंगाल, सिक्कीम, ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच 20 ते 24 जुलै रोजी हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
23 जुलै रोजी ओडिशातील किनारी भागात पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणामध्ये आठवडाभर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम उत्तर प्रदेशातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाची शक्यता
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात 20 ते 26 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेत 20 जुलै रोजी सौराष्ट्र, कच्छ आणि 21 जुलै रोजी मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्याता आला आहे. 23 ते 25 जुलै रोजी विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
त्याचबरोबर, 23 ते 26 जुलै रोजी मध्य प्रदेश, झारखंड आणि बिहारमध्ये 24 ते 26 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या काळात नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.