जुलै महिन्याचा दुसरा आठवडा उलटला असला तरीही समाधानकारक पाऊस न झाल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. परिणामी गृहिणीचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
नांदेड शहरात तरोडा नाका, इतवारा येथे सकाळी वेगवेगळ्या भागातून भाजीपाला येतो. केवळ नांदेडच नव्हे तर अन्य जिल्ह्यातूनही या बाजारात शेतकरी भाजीपाला विकण्यासाठी येतात. व्यापारी हा भाजीपाला खरेदी करून ग्राहकांना विक्री करतात. नांदेड शहरालगत असलेल्या मरळक, निळा, कासारखेडा, सुगाव, थुगाव, नाळेश्वर, आलेगाव या भागातील काही शेतकरी शेतात भाजीपाल्याचे उत्पादन करतात. नगदी पैसे मिळतात अलिकडच्या काळात अनेक शेतक-यांचा भाजीपाला उत्पादनाकडे कल वाढला आहे.
लगतच्या तेलंगणा राज्यातून टोमॅटो, आलू, मिरची तसेच अन्य भाजीपालाही येतो. शिवाय नांदेडमधील कोथिंबीर नागपूरसह राज्याच्या वेगवेगळ्या भागात निर्यात केली जाते.
जमिनीतला ओलावा कमी झाल्यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. शिवाय दीड महिना झाला तरीही समाधानकारक पाऊस न झाल्याने अपेक्षित उत्पन्न होत नसल्याचे शेतक-यांनी सांगितले. मागणी जास्त उत्पादन कमी असल्यामुळे भाजीपाल्याचे दर चांगलेच कडाडले आहेत. एरवी १० रुपये टोमॅटो आता ५० ते ६० रुपये किलोने विक्री होत आहे. टोमॅटोसह, मेथी, पालक, शेपू या पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. भाजीपाल्याचे दर वाढल्याने गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
– शिवाजी मुळे, भाजीपाला विक्रेते, नांदेडपाऊस न पडल्याने तसेच अपेक्षित उत्पादन न झाल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. जोपर्यंत समाधानकारक पाऊस होणार नाही तोपर्यंत हे दर दिवसेंदिवस वाढतच जातील. दर वाढल्याने ग्राहकांची संख्याही कमी झाली आहे.