राज्यात सध्या हिंदीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. पहिलीपासून हिंदीची सक्ती नको, अशी भूमिका महाराष्ट्रातील अनेक पक्ष आणि संघटनांची आहे. मनसेन या विरोधात मोठं आंदोलन उभारलं होतं, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटानं देखील या आंदोलनात उडी घेतली, दरम्यान महाराष्ट्रात राहून आम्ही मराठी बोलणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या इतर भाषिकांविरोधात मनसे, चांगलीच आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळालं.
दरम्यान राज्यात हिंदी भाषेच्या मुद्द्यावर दबाव वाढल्यानं अखेर राज्य सरकारने देखील त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही जीआर मागे घेतले. त्यानंतर मुंबईत विजयी मेळावा पार पडला. हिंदीच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलेलं असतानाच आता दिल्लीतून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे दिल्लीत विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच आंदोलन केलं आहे.
मराठी अध्यायन केंद्राच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जेएनयू विद्यापीठामध्ये आले होते. मात्र ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार होता, त्याच ठिकाणी विद्यार्थी एकत्र जमले आणि त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली, या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सध्या राज्यात मराठी भाषा विरूद्ध हिंदी भाषा असा वाद सुरू झाला आहे, हिंदी भाषिकांवर अन्याय होत आहे. महाराष्ट्रात द्वेषाच राजकारण सुरू आहे, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जेएनयूमध्ये सत्कार नको अशी भूमिका या विद्यार्थ्यांची आहे.
हे सर्व विद्यार्थी जेएनयूनच्या संमेलन केंद्रासमोर एकत्र आले . फडणवीसांचा सत्कार कशासाठी असा सवाल उपस्थित करत या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं, यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. जेएनयू विद्यापीठात एसएफआय संघटनेकडून हे आंदोलन करण्यात आलं आहे.
फडणवीसांनी काय म्हटलं?
दरम्यान मराठी अध्याय केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठी भाषेवर सर्व विद्यापीठांमध्ये संशोधन व्हावं यासाठी हे अध्यायन केंद्र आहे. भाषा हे संवादाचं माध्यम आहे, विवादाचं माध्यम कधीच होऊ शकत नाही. मराठी भाषेचा अभिमान हवाच पण त्यासोबत इतरही भाषेचा अभिमान हवा, हिंदीसोबत मराठीचा वादच नाही, मराठी माणूस संकुचित विचार करू शकत नाही. कुठल्याही भारतीय भाषेचा अभिमान वाटला पाहिजे, असं यावेळी बोलताना फडणवीस यांनी म्हटलं आहे