हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं ५ जणांनी अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. अपहरण केल्यानंतर मारहाण केली आणि पुलावर फेकून देत अपहरण करणारे निघून गेल्याची माहिती हॉटेल मालकाने दिली.
बुधवारी सायंकाळी ही घटना घडली असून सध्या हॉटेल मालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके हे बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या हॉटेलसमोर उभा होते. तेव्हा तिथं आलेल्या एका चारचाकी गाडीतून काही लोक आले. त्यांनी नागेश मडके यांच्यासोबत फोटो काढायचा असल्याचं सांगितलं. सेल्फीच्या बहाण्याने नागेश मडके यांना गाडीत जबरदस्तीने बसवून ओढत नेण्यात आलं.
गाडीतच नागेश मडके यांना मारहाण केली. मारहाण करणारे ४ ते ५ जण होते असा आरोप नागेश मडके यांनी केलाय. अपहरण करून गाडी धाराशिवच्या दिशेनं नेण्यात आली. जीवे मारण्याचा कट रचला होता असंही नागेश मडके यांनी म्हटलंय.
नागेश मडके यांनी दावा केला की, पाच जणांच्या टोळीनं मारहाण करून वडगाव (सि.) इथं पुलावर फेकून देण्यात आलं. या घटनेनंतर कुटुंबियांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, अद्याप गुन्हा दाखल केला नसून लवकर पोलिसात तक्रार देणार असल्याचं नागेश मडके यांनी सांगितलं.