राज्यातील काही वादग्रस्त मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घरचा रस्ता दाखवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ठाकरे गटाने तर राज्यातील 8 मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची बातमी दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेल्याने या चर्चेला अधिकच बळ मिळालं आहे. राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची नवी अपडेट दिल्याने राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल होणार का? याची चर्चा अधिकच जोर धरू लागली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांना राज्यातील फेरबदला विषयी विचारले असता त्यांनी असा कोणताही फेरबदल होणार नसल्याचं स्पष्ट केलं. अशी कुठलीही चर्चा कोअर ग्रुप मध्ये झालेली नाही, मंत्रिमंडळा बाबतचा कुठलाही निर्णय राज्यस्तरावर होत नाही, केंद्रीय स्तरावर होत असतो, अशा प्रकारच्या काही बदल होणार असेल तर तो वेळेवर कळतो. पण सध्या असा काही बदल होईल, असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले
विधानसभा अध्यक्ष बदलला जाण्याचीही जोरदार चर्चा आहे. त्यावर मुनगंटीवार यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. विधानसभा अध्यक्ष पदाबद्दल मला सध्या काही माहीत नाही. पण सध्या असा काही फेरबदल होईल, असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. पुढे नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्या त्या जिल्ह्यातील नेत्यांना मंत्रिपदावरून अस्थिर करण्याचं काम होणार नाही असं मला वाटतं, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
तर आनंदच होईल
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही फेरबदलावर प्रतिक्रिया दिली. विधानसभा अध्यक्ष बदलायचा की नाही हे पक्ष बघेल. पक्षाची जी इच्छा असेल तिच माझी इच्छा असेल. अध्यक्षपद मंत्रिपदापेक्षा मोठं आहे. पद गेलं तर आनंद कसा होईल?तुमच्या आशीर्वादाने नवीन काही जबाबदारी मिळत असेल तर आनंदच होईल, असं राहुल नार्वेकर म्हणाले.
तर जबाबदारी घेईल
माझा पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी स्विकारायला तयार आहे, असंही ते म्हणाले. तसेच जनतेच्या हितात जे निर्णय आहे ते सरकार घेईलच, असंही त्यांनी सांगितलं.