राज्यात मागील काही दिवसांपासून मॉन्सून चांगलाच सक्रिय झाल्याचे बघायला मिळतंय. मुंबई, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, सांगली, गोंदिया, सातारामध्ये पावसाने हजेरी लावली होती. भारतीय हवामान विभागाने काल अनेक भागांमध्ये रेड अलर्ट दिला होता. मुंबईमध्ये आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावलीये. महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले आहे, सध्या राज्यात सर्वत्रच जोरदार पाऊस सुरू आहे.
भारतीय हवामान विभागाकडून मोठा पावसाचा इशारा
आज देखील राज्यातील अनेक भागांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून (IMD) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भमध्ये जोरदार पाऊस होईल. जळगावात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये पाणी साचले असून रस्ते जलमय झाली आहेत.
येलोसह अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी
शनिवारी सकाळीच पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळाले आणि साधारपणे कमी जास्त करत 24 तास पाऊस अनेक भागांमध्ये होता. कोकण घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. रायगडसह पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे 87 टक्के भरली
खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे पाणीसाठा 87 टक्के भरली आहेत. घाटमाथ्यावर मुसळाधार पाऊस होत असल्याने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. चारही धरणांत 87 टक्के पाणीसाठा आहे. पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शनिवारी ही उपस्थिती नोंदवली.
विदर्भातही जोरदार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा
पुढील दोन दिवसात हवामानात फारसा बदल होणार नसल्याने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. घाट विभागात मात्र पावसाचा जोर कायम राहणार असल्याने आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने मराठवाड्याच्या अनेक भागांकडे पाठ फिरवली होती. काल जालना जिल्हात चांगला पाऊस झाला. यामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला.